तिसर्‍या कार्यकाळातच भारत तिसरी आर्थिक शक्ती : पंतप्रधान नरेद्र मोदी | पुढारी

तिसर्‍या कार्यकाळातच भारत तिसरी आर्थिक शक्ती : पंतप्रधान नरेद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एनडीएला 400 हून अधिक जागा तर भारतीय जनता पक्षाला 370 जागा देण्याचा देशाचा निर्धार झाला आहे. आपल्या सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातच भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनेल. हा तिसरा कार्यकाळ अतिशय महत्त्वाच्या निर्णयांचा असेल आणि त्यात पुढील एक हजार वर्षांसाठी देशाची मजबूत पायाभरणी करणारा असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेद्र मोदींनी सलग तिसर्‍यांदा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या या उत्तराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानणारा प्रस्ताव लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 17 व्या लोकसभेचे अंतिम अधिवेशन असून लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर संसदेतील पंतप्रधान मोदींचे भाषण एकप्रकारे भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणारे ठरले. आपल्या दीड तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील निर्णय आणि तिसर्‍या सत्ताकाळातील भावी कार्यपद्धतीची रूपरेषा मांडली. सोबतच विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस, गांधी कुटुंब आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली. तसेच पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या भाषणाचे संदर्भ देत आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा खोचक उल्लेख करून विरोधकांना डिवचण्यात कोणतीही कसर पंतप्रधान मोदींनी शिल्लक ठेवली नाही.

त्यांचा संकल्प विरोधी बाकांचा

विरोधकांनी दीर्घकाळासाठी विरोधी बाकांवरच बसण्याचा संकल्प घेतला आहे. ज्याप्रकारे ते पुढे निघाले आहेत, ते पाहता पुढच्या निवडणुकीनंतर ते प्रेक्षक सज्जामध्ये बसलेले दिसतील, असा चिमटा पंतप्रधान मोदींनी काढला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधींची मतदारसंघ बदलाची आणि राज्यसभा निवडणुकीची चर्चा यावरही खोचक टिप्पणी मोदींनी केली. विरोधकांमधील बरेचजण निवडणूक लढण्याची हिंमतही गमावून बसले आहे. मागील निवडणुकीप्रमाणे आताही ते मतदारसंघ बदलण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काहीजण लोकसभेऐवजी राज्यसभेमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहेत. आपापल्या पद्धतीने ते निर्णय घेतील, असा टोला मोदींनी लगावला.

तिसरी आर्थिक शक्ती बनणारच

भारताच्या आर्थिक प्रगतीची जगभरात प्रशंसा होते आहे. ज्या वेगाने भारताचा विकास होतो आहे, तो पाहता भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनेल. ही मोदीची गॅरंटी आहे, असेही मोदींनी आत्मविश्वासाने सांगितले. काँग्रेसच्या सत्ताकाळात तत्कालीन अर्थमंत्र्यांनी भारतीय अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला होता. तसेच तिसर्‍या क्रमांकावर पोहोचण्यासाठी तीस वर्षे लागतील, असे म्हटले होते. हे सांगणारे अर्थमंत्री ब्रह्मांडातील सर्वात मोठे अर्थतज्ज्ञ होते, अशी कोपरखळी मोदींनी लगावली.

नेहरू म्हणत, भारतीय आळशी

काँग्रेसच्या मानसिकतेने देशाचे मोठे नुकसान केले. देशाच्या सामर्थ्यावर काँग्रेसने कधीच विश्वास ठेवला नाही, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या विधानांचा हवाला देत विरोधकांना डिवचले. भारतीय आळशी असून त्यांची बुद्धिमत्ता कमी दर्जाची असल्याची नेहरूंची विचारसरणी होती; तर इंदिरा गांधी यांचेही मत तसेच होते. काँग्रेसच्या शाही परिवाराचे लोक देशातल्या लोकांना खिजगणतीत धरत नव्हते. आजही तीच विचारसरणी कायम आहे, असा दावा मोदींनी केला.

अलायन्सचे अलाईनमेंट बिघडले

विरोधकांच्या इंडिया आघाडीची खिल्ली उडवताना पंतप्रधानांनी भानामती का कुनबा, असा विरोधकांच्या इंडिया आघाडीचा उल्लेख केला. परस्परविरोधी लोकांना एकत्र आणले आणि पुन्हा एकला चलो रे सुरू झाले, असा टोला लगावताना मोदी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता चिमटा काढला. काँग्रेसचे लोक अलीकडेच मोटर मेकॅनिकचे काम शिकले आहेत. त्यामुळे त्यांना संतुलनाची (अलाईनमेंट) जाण आलीच असेल. पण अलायन्सचे अलाईनमेंट (आघाडीचे संतुलन) बिघडले असल्याचे मोदी म्हणाले. ज्यांचा आपल्याच समूहामध्ये एकमेकांवर विश्वास नाही, त्यांचा देशातल्या जनतेवर विश्वास कसा असेल, असा उपरोधिक प्रश्नही पंतप्रधानांनी विचारला.

Back to top button