भारतात 55 कोटी ऑनलाईन गेमर्स! | पुढारी

भारतात 55 कोटी ऑनलाईन गेमर्स!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील विविध हायकोर्टांत दाखल झालेल्या शपथपत्रांनुसार, देशातील गेमिंग कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर 55 कोटींहून अधिक लोक गेम खेळत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

नशीब, कौशल्य असे अनेक तर्क या गेमिंग प्लॅटफॉर्मबद्दल संबंधित कंपन्यांकडून अनेक तर्क दिले जात असले तरी या गेमिंगमुळे, विशेषत: क्रिकेट ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक सेलिब्रिटीज या ऑनलाईन गेमिंगचे ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर आहेत. त्यांच्यावरही कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी विविध न्यायालयांतून दाखल याचिकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

कर्ज काढून जुगार
खासगी सावकाराकडून तरुण कर्ज काढून हा जुगार खेळतात. कर्जबाजारी होऊन आत्महत्येची वेळही अनेकांवर ओढवते आहे.

पुण्यात युवकाने गमावले 30 लाख
पुण्याचे प्रकाश मुंदडा हे कोळशाचे व्यापारी आहेत. त्यांना दोन मुली. वय झाल्याने आता कामे होत नव्हती. म्हणून त्यांनी मदतीसाठी मुंबईतील मोठ्या मुलीचा मुलगा गिरिराज (वय 18) याला सोबत घेतले. देवाणघेवाणही त्याच्यामार्फत होऊ लागली. एक दिवस खात्यात 30 लाख रुपये कमी असल्याचे मुंदडा यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्काच बसला. गिरिराजने हा पैसा क्रिकेट बेटिंगमध्ये गमावल्याचे नंतर समोर आले.

22 लाखांचे कर्जआणि मग घटस्फोट
हरियाणातील अंजली साहू व पंकज खरे हे जोडपे दिल्लीत आले. पंकजला हॉटेलात तर अंजलीला विमान कंपनीत नोकरी लागली. पंकज क्रिकेट बेटिंगमध्ये अडकला. त्याच्यावर 22 लाखांचे कर्ज झाले. नोकरी गेली. अंजलीलाही 3 ते 4 लाखांचे कर्ज काढावे लागले. मग वाद वाढले. यातून घटस्फोट झाला.

आकडे बोलतात…

६ राज्ये, उच्च न्यायालये करताहेत ऑनलाईन गेमिंग व जुगार यातील फरक शोधण्याचा प्रयत्न
७ प्लॅटफॉर्मवर देशभरात 55 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.
५०० कोटींचा सट्टा दररोज
१. ८० लाख कोटींचा सट्टा वर्षभरात

Back to top button