आजार लपवून कामावर जाणार्‍यांची संख्या मोठी! | पुढारी

आजार लपवून कामावर जाणार्‍यांची संख्या मोठी!

जाल खंबाटा

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी असून सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशात अनेकजण आजारी असूनही वर्कलोड किंवा रजा टाळण्यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात. त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही, तर इतरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. असे आजारपण लपवून कामावर जाणार्‍यांची संख्या मोठी असल्याचे नुकतेच अमेरिकेतील एका अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, कार्यालय असो अथवा सार्वजनिक ठिकाण, एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार असल्याचे निदर्शनास येताच बाकीचे लोक त्या व्यक्तीपासून लांब राहणे पसंत करतात. ही स्थिती त्या व्यक्तीच्या मनात जणू बहिष्काराची भावना निर्माण करते. हे टाळण्यासाठी बरेचजण आपला आजार लपविण्याचा प्रयत्न करतात, असे मिशिगन विद्यापीठातील मानसशास्त्राचा विद्यार्थी विल्सन मेरेल याने नमूद केले.

तो म्हणाला, निरोगी लोकांना वाटते ते सहज पसरणारे आणि गंभीर लक्षणांचे आजार लपवू शकत नाहीत. याउलट खरोखरच आजारी असलेल्या व्यक्तींनी त्यांचा आजार इतरांसाठी किती हानिकारक आहे, याची पर्वा न करता तो लपविण्यावर भर दिल्याचे आढळून आले आहे.

दहा अभ्यासांचे विश्लेषण

कोरोनाकाळात काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना स्क्रिनिंग अनिवार्य केले होते. मात्र, 41 टक्के विद्यार्थ्यांनी आजार लपविण्यासाठी त्याचा गैरवापर केल्याची कबुली दिल्याचे मेरेल यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील 4,100 पेक्षा अधिक विद्यार्थी, आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांशी संबंधित 10 अभ्यासांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यातील 75 टक्के सहभागींनी परस्परसंवादादरम्यान आपले आजारपण इतरांपासून लपविल्याची कबुली दिली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांपैकी 61 टक्के सहभागींनी यावर मौन बाळगले. मात्र, काहींनी अनिवार्य असणारे अ‍ॅप आधारित लक्षणे ओळखण्याचे उपकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचे मान्य केले.

Back to top button