राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक देश एक निवडणुकीला पाठिंबा | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक देश एक निवडणुकीला पाठिंबा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटुन एक देश एक निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेवुन या संदर्भातील निवेदन दिले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद एक देश एक निवडणुकीसंदर्भात तयार केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.

देशातील निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोईस्कर व्हाव्यात यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ हे एक महत्वाचे पाऊल असेल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीचा एक देश एक निवडणुकीला विरोध आहे. तसे पत्रही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समितीचे सचिव नितीन चंद्रा यांना लिहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत प्रतिकूल प्रतिक्रिया दिली होती. मात्र, राष्ट्रवादीतील अजित पवार गट एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर एनडीएला पोषक भूमिका अजित पवार गट घेत आहे. त्याच धोरणाचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा, विधानसभेच्या एकत्रित निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीच्या काही बैठकाही झाल्या आहेत. या समितीमध्ये रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष कश्यप, ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, माजी दक्षता आयुक्त संजय कोठारी यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही या समितीत समावेश होता. मात्र त्यांनी सदस्यपदाच्या राजीनामा दिला होता.

हेही वाचा

Back to top button