पन्हाळा, रायगड, शिवनेरीसह १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घ्या; केंद्र सरकारची शिफारस | पुढारी

पन्हाळा, रायगड, शिवनेरीसह १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घ्या; केंद्र सरकारची शिफारस

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या इतिहासातील गौरवास्पद असलेल्या मराठा साम्राज्यातील बारा स्थळे युनेस्कोच्या 2024-25 च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने शिफारस केली आहे. त्यात शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड आणि पन्हाळागडाचाही समावेश आहे.

सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठा साम्राज्याने भारताचा नकाशा व्यापला होता. या कालावधीत सह्याद्रीच्या रांगा, कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि पूर्व घाटाच्या भागातही मराठा साम्राज्याचा विस्तार झाला होता. या कालावधीत बांधण्यात आलेले किल्ले वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात सामरिकदृष्ट्या सखोल विचार केल्याचे स्पष्ट दिसते. याच वैशिष्ट्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुढे विस्तारलेल्या मराठा साम्राज्यातील बारा ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करावा अशी शिफारस भारताच्या वतीने अधिकृतरीत्या करण्यात आली आहे.

बारा ठिकाणांची नावे

शिवनेरी, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, साल्हेर, लोहगड, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी.

सध्या भारतात 42 वारसा स्थळे

युनेस्कोने आतापर्यंत जाहीर केलेल्या वारसा स्थळांच्या यादीत भारतातील 42 स्थळे आहेत. त्यातील सहा स्थळे महाराष्ट्रात आहेत. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम घाट यांचा समावेश आहे.

Back to top button