दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणात हत्या | पुढारी

दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणात हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील सहायक पोलिस आयुक्तांच्या मुलाची हरियाणा इथे हत्या केली गेली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली गेली आहे. हरियाणामधील पानिपत येथे या युवकाचा पाण्यात ढकलून खून करण्यात आल्याचं समोर येत आहे. लक्ष्य चौहान (वय 26) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. एसीपी यशपाल चौहान यांचा तो मुलगा आहे. तो 22 जानेवारीपासून बेपत्ता असल्याचं समजत आहे. पेशाने वकील असलेला लक्ष्य हरियाणातील भिवानी येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिषेक आणि विकास हे कोर्टात काम करणारे सहकारीही होते. लक्ष्य घरी न आल्याने वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

शोधाशोध करून पोलिसांनी लक्ष्यचा सहकारी 19 वर्षीय अभिषेकला दिल्लीतील नरेला येथील जवाहर कॅम्प येथून अटक केली. चौकशीदरम्यान विकासने अभिषेकला सोबत हरियाणा येथील लग्नासाठी येण्याबाबत विचारल्याच समोर आलं. तिथेच हा खुनाचा प्लान तयार झाला. या खुनामागे पैशाच्या देवघेवीचं कारण असल्याचं समोर आलं आहे. अभिषेकने लक्ष्यला काही पैसे उसने दिले होते. ते परत मागितल्यावर लक्ष्यने त्याचा अपमान करत मारहाणही केल्याचं समोर आलं. यानंतर अभिषेकने लक्ष्यची हत्या करण्याची योजना बनवली. त्यानुसार लग्नाहून परत येताना पानिपत येथील कॅनलमध्ये लक्ष्य याला ढकलल्यानंतर त्या दोघांनीही तिथून पलायन केलं. पोलिसांना अजूनही लक्ष्यचा मृतदेह मिळाला नसून त्याचा शोध सुरू आहे.

Back to top button