पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील इंडिया आघाडीची जोरदार चचां सुरु असतानाच पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घाेषणा तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवार, २५ जानेवारी रोजी जाहीर केली. यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. हा निर्णय घेण्यामागील कारण काय, या प्रश्नाचे उत्तर तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी वृत्तसंस्था 'एएनआय'शी बोलताना दिले.
काँग्रेस पक्षाशी माझी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल, याची मला चिंता नाही, परंतु आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच काँग्रेसचा पराभव करू, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली होती.
डेरेक ओ'ब्रायन म्हणाले की, "इंडिया आघाडीचे दोन मुख्य विरोधक आहेत एक भाजप आणि दुसरे अधीर रंजन चौधरी कारण चौधरी हे भाजपचीच भाषा बोलत आहेत. पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हेच जबाबदार आहेत."
भारत जोडो न्याय यात्रा आज (दि.२५) पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, असा विश्वासच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. मला पश्चिम बंगालमध्ये आल्याचा आनंद झाला आहे.भाजप- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशभरात द्वेष, हिंसा आणि अन्याय पसरवला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.