प्राणप्रतिष्ठेच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहतील : पंतप्रधान मोदी | पुढारी

प्राणप्रतिष्ठेच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहतील : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहतील, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी हा सोहळा अनेक वर्षे आठवणीत राहील, असे सांगितले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चित्रफीत मोदी यांनी एक्स या सोशल साईटस्वर शेअर केली. मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य देशातील जनतेला मिळाले.

दूरचित्रवाहिन्यांवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्यामुळे लोकांना घरातून अद्भुत सोहळ्याची अनुभूती घेता आली. अनेकांनी गावातील मंदिरातच हा सोहळा साजरा केला. अयोध्येतील राम मंदिर भव्य आहे. मंदिराचे बांधकाम मजबूत करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराचे वैभव हजारो वर्षे टिकणार आहे. पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निवाड्यामुळे वादग्रस्त ठिकाणी प्रभू राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे.

काही वेळेत एक कोटी लाईक्स

गर्भगृहात रामलल्लाची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करतानाची पोस्ट मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली. वैदिक मंत्रोच्चारात पार पडलेल्या सोहळ्याच्या पोस्टला काही वेळेतच एक कोटी लाईक्स मिळाल्या आहेत.

15 दाम्पत्य भारावले

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 15 दाम्पत्यांनी सहभाग घेतला होता. दैवी आविष्काराची अनुभूती घेता आली. या आठवणी कायमस्वरूपी स्मरणार्थ राहतील, अशी भावना या दाम्पत्यांनी व्यक्त केली. मुख्य आयोजक म्हणून या दाम्पत्यांची निवड केली होती. यामध्ये दलित, मागास, आदिवासी आणि उच्चवर्णीयांचा समावेश होता.

हवाई दलामुळे भाविकाचे प्राण वाचले

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान रामकृष्ण श्रीवास्तव या भाविकास हृदयविकाराचा झटका आला होता. हवाई दलातील जवानांच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर मोबाईल हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचार करता आले. यामुळे या भाविकाचे प्राण वाचले.

Back to top button