‘ज्ञानवापी’, ‘शाही इदगाह’ मुस्लिमांनी हिंदूना हस्तांतरित करावे : पुरातत्त्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद | पुढारी

'ज्ञानवापी', 'शाही इदगाह' मुस्लिमांनी हिंदूना हस्तांतरित करावे : पुरातत्त्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद

पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त बाबरी मशिद ही हिंदू मंदिरावर उभी आहे, याचे पुरावे सादर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरातत्त्व विभागाचे निवृत्त विभागीय संचालक के. के. मोहम्मद यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदी आणि मथुरेतील शाही इदगाह या दोन्ही जागा मुस्लिमांनी स्वेच्छेचे हिंदूंना हस्तांतरित कराव्यात, असे मत व्यक्त केले आहे. मोहम्मद यांनी नागर शैलीत बांधलेल्या राम मंदिराचे कौतुक केले आहे. (KK Mohammad)

मोहम्मद यांनी सादर केलेले पुरावे रामजन्मभूमी चळवळीत आणि कायदेशीर लढ्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. विशेष म्हणजे मोहम्मद यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त प्राचीन हिंदू मंदिरांच्या शास्त्रीयरीत्या जीर्णोधारही केलेला आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिद आणि शाही इदगाह संदर्भातील त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोहम्मद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सविस्तर मुलाखत दिली आहे. अयोध्येत राममंदिराच्या अनुषंगाने ही मुलाखत आहे. ते म्हणाले, “मी काशी विश्वनाथ आणि मथुरा या दोन्ही ठिकाणी अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. मला असे वाटते मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा आणि दोन्ही जागा हिंदूंना हस्तांतरित कराव्यात. पण यानंतर असे विषय थांबले पाहिजेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही प्रत्येक मशिदीत काय आहे, हे पाहू नका, असे म्हटले आहे.” (KK Mohammad)

‘बाबरी’ मुस्लिमांसाठी महत्त्वाची नाही

मोहम्मद म्हणतात की, शाही इदगाह किंवा ज्ञानवापी मशिद मुस्लिमांसाठी धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या नाहीत. ते म्हणाले, “बाबरी मशिद, शाही इदगाह, ज्ञानवापी मशिद ही ठिकणी मुस्लिमांसाठी फक्त मशिदी आहेत. ही तिन्ही स्थळे मोहम्मद पैगंबर किंवा त्यांच्या नंतरचे खलिपा यांच्याशी संबंधित नाहीत. हे स्थलांतरित करता येऊ शकतात. पण हिंदूच्या बाबतीत असे नाही. मुस्लिमांसाठी मक्का आणि मदिनाचे जे महत्त्व आहे, ते हिंदूच्या दृष्टीने अयोध्येचे आहे.”

मार्क्सवादी इतिहासतज्ज्ञांनी समझोता रोखला | KK Mohammad

ते म्हणाले, “मी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात होतो, त्यावेळी तिथल्या बऱ्याच मुस्लिमांची भूमिका होती की, बाबरी मशिदीचा विषय सामंजस्याने सोडवला पाहिजे. लखनऊमधील काही प्रभावी मुस्लिम नेते होते, त्यांनाही अयोध्येतील जागा हिंदूंना द्यायची होती. पण माझ्या माहितीनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही इतिहासतज्ज्ञ आणि प्रा. इरफान हबीब यांनी मुस्लिमांची दिशाभूल केली.”

हेही वाचा

Back to top button