श्री रामलल्लाच्या प्रसादात रेवडी, लाडू, तुलसीपत्र, राम दीप | पुढारी

श्री रामलल्लाच्या प्रसादात रेवडी, लाडू, तुलसीपत्र, राम दीप

अयोध्या; वृत्तसंस्था : श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक निमंत्रितास प्रसादवाटप करण्यात आले. या प्रसादाच्या बॉक्समध्ये गुळाची रेवडी, दोन लाडू, राम दीप अशा सात वस्तू आहेत. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद म्हणून प्रत्येक निमंत्रिताने ही भेट भाविकपणे स्वीकारली.

या सोहळ्याला येणार्‍या निमंत्रितांसाठी महाप्रसाद आणि प्रसादाचे बॉक्स तयार करण्याची जबाबदारी मंदिर ट्रस्टने काही संस्थांकडे दिली होती. लखनौच्या छप्पन भोग या नामवंत मिठाई व्यापार प्रतिष्ठानाकडे 15 हजार प्रसाद बॉक्स देण्याचे काम केले. या कामासाठी त्यांनी मानधनही नाकारले. तेथे महाप्रसाद म्हणून सात्त्विक भोजनाची सुविधा ठेवण्यात आली होती. शुद्ध देशी तुपात हा महाप्रसाद तयार करण्याचे काम भारती गरवी गुजरात आणि संत सेवा संस्थान गुजरात या संस्थांनी केले. निमंत्रितांना देण्यात आलेल्या प्रसादाच्या बॉक्समध्ये गूळ रेवडी, दोन साजूक तुपातील मावा लाडू, रामदाण चिक्की, अक्षत आणि रोली, तुलसीपत्र, राम दीप आणि वेलची दाणे अशा सात वस्तू आहेत.

नागपूरमध्ये बनला सहा हजार किलोचा हलवा

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरच्या कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात सहा हजार किलोचा श्रीराम हलवा तयार केला गेला. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 1,800 किलो वजनी हा हलवा तयार केला आहे.

Back to top button