रामलल्लाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भाविकांनी फुलली अयोध्यानगरी | पुढारी

रामलल्लाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भाविकांनी फुलली अयोध्यानगरी

अयोध्या : सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या घोषणांनी शरयू तीरावरची अयोध्यानगरी दुमदुमली आहे. आसमंतात चैतन्य आणि पावित्र्याचा दरवळ पसरला असून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. शेवटच्या काही तासांच्या हुरहुरीचा अनुभव घेत हजारो भाविकांनी अयोध्येत रविवारचा दिवस घालवला. सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रितांचीच उपस्थिती राहणार असली, तरी मंगळवारपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून अयोध्येत देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे.

सोमवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला हजर राहण्याची संधी 8 हजार निमंत्रितांनाच मिळणार आहे. त्यामुळे तो सारा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे सामान्य भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मात्र, तरीही मंगळवारपासून सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार असल्याने हजारो भाविक आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी आसपासच्या परिसरात मिळेल तेथे आसरा घेतला आहे. अगदी सार्वजनिक बागांमध्येही हे भाविक थांबले आहेत. या सर्व भाविकांना आणखी एक दिवस वाट बघावी लागणार आहे. मंगळवारी किमान दीड लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज आहे. असे असले तरी रामलल्लाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अयोध्येतील इतर मंदिरांत रांगा लावून या भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांचे जत्थेच्या जत्थे जय श्रीरामच्या घोषणा देत, हातातील भगवे ध्वज उंचावत अयोध्यानगरी डोळे भरून पाहत फिरताना दिसत होते. कडेकोट सुरक्षा असलेला भाग वगळता अयोध्या आणि परिसरात हजारो भाविकांचा जणू पूरच आला होता. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, तामीळनाडूपासून आसामपर्यंत देशाच्या कानाकोपर्‍यातून हे भाविक पहिल्याच दिवशी रामलल्लाला डोळे भरून पाहण्यासाठी आले आहेत.

निमंत्रितांचे आगमन

दुसरीकडे या सोहळ्यासाठी देश-विदेशातून निमंत्रित यायला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले आहेत, तर सकाळी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, शेफाली शहा, संगीतकार अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा आदी रविवारी अयोध्येत दाखल झाले. रविवारी सायंकाळी अभिनेता रजनीकांत, रामचरण, गायक शंकर महादेवन अयोध्येत दाखल झालेे. याशिवाय अमिताभ बच्चनदेखील रात्री अयोध्येत पोहोचले.

Back to top button