अयोध्येत १० हजार सीसीटीव्ही, २५ हजार सुरक्षारक्षक | पुढारी

अयोध्येत १० हजार सीसीटीव्ही, २५ हजार सुरक्षारक्षक

अयोध्या; वृत्तसंस्था : 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा रविवारी सहावा दिवस होता. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होईल. रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल. रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने पंतप्रधान काजळ लावतील. रामलल्लाला आरसा दाखवतील.

अयोध्या या ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्यासाठी सज्ज झाली असून, सोमवारी शहरात 11 लाख दिवे चेतविले जाणार आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल 25 हजारांवर जवान तैनात आहेत.
रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला. सायंकाळच्या आरतीनंतर आजचे सर्व विधी पूर्ण झाले. सायंकाळी रामलल्ला विराजमान यांच्या जुन्या मूर्तीची पूजाही झाली. त्यांनाही विधिवत राम मंदिरात नेण्यात आले. रामलल्लासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्यांचे तिघे बंधू तसेच हनुमंताची अस्थायी मंदिरातील मूर्तीही राम मंदिरात नेण्यात आली. शाळिग्रामही मंदिरात दाखल झाला. सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी दहापासून मंगल ध्वनी वाजविण्यात येईल. विविध राज्यांतून आलेली 50 हून अधिक वाद्ये वाजविली जातील. हा कार्यक्रम दोन तास चालेल.

शनिवारी सायंकाळीच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. आता सोमवार मावळेपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित पाहुण्यांनाच, तेही पास दाखवल्यावरच अयोध्येत प्रवेश मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले असून मुख्यमंत्री सुरक्षा व्यवस्था आदी सर्वच घडामोडींवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे.

10 हजार सीसीटीव्ही, 25 हजार सुरक्षारक्षक

* 10 हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने प्रत्येकाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
* 13 हजार पोलिसांसह सर्व मिळून 25 हजारांपर्यंत सुरक्षारक्षक तैनात आहेत.
* 31 आयपीएस, 44 एएसपी, 140 सीओ, 208 इन्स्पेक्टर, 1196 एएसआय.
* 5 हजार हेड कॉस्टेबल आणि पीएसीच्या 26 कंपन्या
* 7 कंपन्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या
* 1 एटीएस आणि 1 एसटीएफचे पथक
* 300 सुटाबुटातील सैनिक व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी

Back to top button