Ram Mandir pran pratishtha ceremony : प्रभू श्रीरामचंद्रांच्या वंशात जन्मलेली राजकुमारी श्रीरत्ना ही कुण्या एकेकाळी कोरियाची (फाळणीनंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे आज हे 2 देश) महाराणी होती, हे किती जणांना आज खरे वाटेल? कोरियन इतिहास मात्र हा रघुवंशी वारसा शतकानुशतके मोठ्या अभिमानाने सांगत-मिरवत आलेला आहे.
आजपासून 2 हजार वर्षांपूर्वी रघुकुलातील राजा पद्मसेन व राणी इंदुमती यांच्या पोटी जन्मलेली अयोध्येची राजकुमारी श्रीरत्ना ही समुद्रमार्गे एका विशेष जहाजातून कोरियापर्यंत धडकली. पुढे चक्क कोरियाची महाराणी बनली. कोरियाचे तत्कालीन सम्राट सुरो यांच्याशी श्रीरत्नाचा विवाह झाला. स्वत:ला सुरो व श्रीरत्ना यांचे वंशज म्हणविणारे आजही दक्षिण कोरियात ढिगाने आहेत. श्रीरामजन्मभूमीच्या जागेचा अंतिम निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयात लागला तेव्हा दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या आनंदलाही भरते आले होते.
दक्षिण कोरियाच्या दिल्लीतील राजदूतांनी थेट भारत सरकारला विनंती केली की, दक्षिण कोरियालाही या आनंदात सहभागी करून घ्या… राजधानी दिल्लीही या विनंतीने थक्क झाली होती. कोरियन राजदूताने वरीलप्रमाणे नाते सांगितले तेव्हा क्षणभर भारतीय अधिकार्याचा विश्वास बसेना… नंतर सारा उलगडा झाला… उत्तर प्रदेश सरकार आणि दक्षिण कोरियातर्फे मग संयुक्तरीत्या कोरियन महाराणी श्रीरत्नादेवींच्या स्मृतिप्रीत्यर्थ राणी हो पार्क (हो हे श्रीरत्नादेवींचे कोरियन नाव) या स्मारकाचे काम अयोध्येला झाले.
दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जोंग सुक या स्वत: स्मारकाच्या उद्घाटनाला आल्या होत्या. अयोध्या हे आमचे मामाचे गाव, असे भावपूर्ण उद्गार तेव्हा किम जोंग सुक यांनी काढले होते. शरयू तटावर म्हणजे आजोळी (मामाच्या गावाला) श्रीरत्नादेवींचे भव्य स्मारकही दिमाखाने उभे आहे. तुलसीदास घाटालगतच हे स्मारक आहे. स्मारकात जावयालाही मोठा मान देण्यात आलेला आहे. राजा सुरो यांच्यासाठी खास किंग पॅव्हेलियन तयार केलेले आहे. श्रीरत्नादेवींच्या कोरियापर्यंतच्या प्रवासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जहाजाची प्रतिकृती आहे. अयोध्येला आजोळ मानणारे गिमहे किम वंशाचे लोक थोडेथोडके नाहीत. तब्बल 60 लाख आहेत!
2010 मध्ये दक्षिण कोरियात किम सुरो यांच्यावर एक दूरदर्शन मालिका दक्षिण कोरियात प्रसारित झाली होती. या मालिकेत सुरो यांची रघुवंशी पत्नी श्रीरत्ना उपाख्य राणी हो यांची भूमिका सेओ-जी-हाय या विख्यात अभिनेत्रीने साकारली होती.