आसाममध्‍ये भारत जोडो न्‍याय यात्रेतील वाहनांवर हल्‍ला : काँग्रेसचा दावा | पुढारी

आसाममध्‍ये भारत जोडो न्‍याय यात्रेतील वाहनांवर हल्‍ला : काँग्रेसचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आसाममधील सोनितपूर जिल्‍ह्यात भारत जोडो न्याय यात्रेतील वाहनांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्‍ला केल्‍याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या संपर्क समन्वयक महिमा सिंग यांनी आज (दि.२१) माध्‍यमांशी बोलताना केला. (Congress alleges attack on Bharat Jodo Nyay Yatra in Assam)

महिमा सिंग यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून जात आहे. आज यात्रेचा चौथा दिवस आहे. राहुल गांधी नागाव जिल्ह्यातील कालियाबोर येथे रॅलीला संबोधित करण्यापूर्वी हा ह्‍ल्‍ला झाला. भाजप समर्थक राहुल गांधी यांच्‍या आगमनापूर्वी त्यांच्या मार्गावर मोर्चा काढत होते, तेव्हा भारत जोडो न्याय यात्रेची काही वाहने त्या भागातून जात होती. त्यानंतर त्यांनी काही वाहनांची तोडफोड केली आणि काँग्रेसच्या यात्रेतील पत्रकारांवरही हल्ला केला. ( Congress alleges attack on Bharat Jodo Nyay Yatra in Assam )

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि इतर काही लोकांची गाडी जमुगुरीघाटाजवळ मुख्य यात्रेत सामील होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यांच्या वाहनातील काँग्रेस जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडले गेले. हल्लेखोरांनी गाडीवर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला आणि मागील काच जवळपास तोडली.यात्रेचे कव्हरेज करणाऱ्या व्लॉगरचा कॅमेरा, बॅज आणि इतर उपकरणे हिसकावून घेण्यात आली. पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली,” असा दावाही महिमा सिंग यांनी केला आहे.

हल्ल्यामागे मुख्‍यमंत्री हिमंता सरमाच्या गुंडांचा हात : जयराम रमेश यांचा आरोप

आपल्या कारभोवती भाजपचे झेंडे घेऊन जाणाऱ्या लोकांच्या एका गटाचा व्हिडिओ काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी वाहनांवर पाणी फेकले. भारत जोडो न्‍याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजी केली.या हल्ल्यामागे आसामचे मुख्‍यमंत्री हिमंता सरमा याचा हात आहे, असा गंभीर आरोपही जयराम रमेश यांनी केला आहे.

 

Back to top button