अयोध्या; वृत्तसंस्था : श्री रामलल्लाचा जलाधिवास विधी आज संपुष्टात आला. श्री रामलल्लाभोवतीचे आवरणही काढून घेण्यात आले. डोळ्यांवर मात्र पट्टी बांधलेली आहे. प्राणप्रतिष्ठादिनी 22 जानेवारीला ती उघडण्यात येईल. यादिवशी पंतप्रधान सुवर्णदंडिकेने श्री रामलल्लाच्या डोळ्यांत काजळ लावतील आणि त्यांना आरसा दर्शन करवतील. तत्पूर्वी, शुक्रवारी आणखी एक उत्तम गोष्ट घडली. ती म्हणजे, डोळ्यांना पट्टी बांधण्यापूर्वीचा श्री रामलल्लाचा लोभस, पवित्र आणि भक्तांना आश्वस्त करणारा चेहरा समोर आला. श्री रामलल्लाचे हे लोभस बालस्वरूप पाहून अवघा देश प्रसन्न झाला.
अयोध्येत 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा विधी सुरू आहेत. शुक्रवारी या विधींचा चौथा दिवस होता. सायंकाळी मंदिर संकुलातील श्री रामलल्लाचे अस्थायी मंदिर बंद करण्यात आले. आता भाविक इथे दर्शन घेऊ शकणार नाहीत. 22 जानेवारीनंतर 23 पासून अवघे मंदिरच दर्शनासाठी खुले होणार आहे. जलाधिवासानंतर शुक्रवारी सकाळी 9 वाजता मूर्तीचा औषधाधिवास, केशराधिवास विधी पार पडला. दुपारी एक वाजता घृताधिवास (तुपाधिवास) झाला. दुपारी 2 वाजता अन्नाधिवास पार पडला. अरणी मंथनातून उत्पन्न झालेला अग्निकुंड स्थापन करण्यात आला असून, यज्ञविधी सुरू आहेत. 20 जानेवारी रोजी वास्तुशांती होईल.
गर्भगृहात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात गैर काहीही नाही. भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
– जगद्गुरू रामभद्राचार्य,
श्री रामानंद संप्रदाय, चित्रकुट