EVM VVPAT : निवडणूक आयोगाकडून इव्हीम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती मोहीम | पुढारी

EVM VVPAT : निवडणूक आयोगाकडून इव्हीम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती मोहीम

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : EVM VVPAT : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल होणाऱ्या राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देशभरात जनजागृती मोहीम राबविणार आहे. महाराष्ट्रासह ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम असेल. तर, अलीकडेच विधानसभा निवडणुका झालेली पाच राज्ये यातून वगळली आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटकपक्षांकडून इव्हीएमद्वारे मतदानावर शंका उपस्थित करण्यात आली होती.

निवडणूक आयोग ३५०० हून अधिक प्रात्यक्षिक केंद्रे आणि जवळपास ४२५० मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम राबविणार आहे. इव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅटचा प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून दिला जाणार आहे. जनजागृती मोहीम लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयोजित केली जाते. अनेक लोकांना ईव्हीएमबद्दल समज गैरसमज आहेत. त्यातील गैरसमज दूर करणे, नागरिकांना इव्हीएम मशीनची ओळख करुण देणे, या जनजागृती मोहीमेत नागरिकांना ईव्हीएमचे वैशिष्ट्ये सांगणे, मतदानाच्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे, त्या संदर्भात नागरिकांना प्रशिक्षण देणे, व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची सत्यापना कशी करावी याची माहिती देणे, मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. (EVM VVPAT)

या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील ३४६४ विधानसभांमध्ये जनजागृती होणार आहे. यात ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तर ६१३ जिल्ह्यांचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वी पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यांना या मोहीमेतून वगळले आहे. (EVM VVPAT)

Back to top button