आम्ही ९ वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य्रमुक्त केले : पंतप्रधान मोदी | पुढारी

आम्ही ९ वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य्रमुक्त केले : पंतप्रधान मोदी

कोची; वृत्तसंस्था : काँग्रेसने 50 वर्षांत केवळ गरिबी हटाओचा नारा दिला. आम्ही नऊ वर्षांत देशातील 25 कोटी गरिबांना दारिद्य्रातून बाहेर काढले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळ्याला संबोधित करताना ते म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात कमजोर सरकार होते. त्या काळात देशात दहशतवादी हल्ले होत होते. आज भारताला जगात विश्वगुरू म्हणून ओळखले जात आहे. मुस्लिम देशांमध्येही भारताबद्दल आदर वाढला आहे. काँग्रेसला जे जमले नाही, ते आम्ही विकासाच्या मार्गातून दाखवून दिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या मतदान केेंद्रावर लक्ष केंद्रित करून भाजपच्या विकास कार्याची लोकांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौर्‍यामध्ये 4 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे बुधवारी उद्घाटन केले.

रोड शो अन् पूजाअर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी कोची या ठिकाणी रोड शो केला. यावेळी त्यांनी उपस्थित समर्थकांना अभिवादन केले. मोदी यांच्या रोड शोमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. तत्पूर्वी, मोदी यांनी गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. धोती आणि पायजमा या पारंपरिक पोशाखात मोदी यांनी या मंदिरात प्रार्थना केली.

Back to top button