

अयोध्या; वृत्तसंस्था : गर्भगृहातील प्रतिष्ठापना विधीअंतर्गत श्री रामलल्लाची एक मूर्ती बुधवारी श्रीराम जन्मभूमी संकुलात आणण्यात आली. मूर्तीचे पालखीमधून मंदिर परिसरात भ्रमणही पार पडले. नगरभ्रमणही झाले. शरयू तटावरून मंदिरापर्यंत महिलांची कलशयात्राही काढण्यात आली.
मूर्तीच्या आसनाचे पूजन करण्यात आले. दुपारी अडीच वाजता निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुरोहित सुनील दास यांनी गर्भगृहात ही पूजा केली. गर्भगृहात प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचेही शुद्धीकरण झाले. श्री रामलल्लाच्या डोळ्यांवर आता पट्टी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, ती 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठादिनीच उघडली जाईल.
श्री रामलल्लाच्या दहा किलो वजनाच्या प्रतिकृतीचा वापर बुधवारच्या नगरभ्रमण, मंदिर संकुल भ्रमण अशा बहुतांश विधींतून करण्यात आला. प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचे वजन जास्त (200 किलो) असल्याने या लहान मूर्तीच्या साहाय्यानेच हे विधी पार पाडले गेले.
मध्यंतरीच्या काळात गर्भगृहात प्रतिष्ठापित करावयाची म्हैसूर येथील अरुण योगीराज यांनी साकारलेली 200 किलो वजनाची मूर्तीही कार्यशाळेबाहेर मंदिर संकुलात आणली गेली.