

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस लोकांकडून सूचना आणि अभिप्राय मागवुन जाहीरनामा तयार करणार आहे. मात्र, इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत जाहिरनाम्याबाबत चर्चा करायची असल्यास ती काँग्रेस अध्यक्षांच्या स्तरावर होईल, आम्ही केवळ पक्षपातळीर काम करत आहोत. असे काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. (Congress on Lok Sabha 2024)
काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांचा जाहीरनामा असला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. यात जास्तीस जास्त लोकांचा सहभाग मिळवुन लोकाभिमुख जाहीरनामा तयार करणे ही काँग्रेसची रणनिती असणार आहे. यासाठी काँग्रेसने इमेल आयडी आणि संकेतस्थळ देखील प्रसिद्ध केले आहे. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि संयोजक टी. एस. सिंहदेव, सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी कॉंग्रेस मुख्यालयात यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. (Congress on Lok Sabha 2024)
यावेळी बोलताना पी. चिदंबरम म्हणाले की, आमच्या समितीच्या प्रत्येक सदस्याने एक ते दोन राज्यांची जबाबदारी घेतली आहे. विविध माध्यमातून लोकांच्या सूचना घेतल्या जातील. यासाठी त्यांनी एक इमेल आयडी आणि संकेतस्थळ देखील घोषित केले. देशातील तरुण, महिला, युवक, शेतकरी, विविध कर्मचारी आणि सर्व घटकातील लोकांनी यामध्ये सूचना द्याव्यात असे आवाहनही पी. चिदंबरम यांनी केले. (Congress on Lok Sabha 2024)
देशातील नागरिकांकडुन आलेल्या सर्व सूचनांची विषयनिहाय विभागणी केली जाईल. प्रत्येक राज्यात एकदा तरी सार्वजनिक स्वरूपात लोकांकडुन सूचना पाठवल्या जाव्यात, अशी अपेक्षा पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली. तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत जाहिरनाम्याबाबत चर्चा करायची असल्यास ती काँग्रेस अध्यक्षांच्या स्तरावर होईल, आम्ही केवळ पक्षपातळीर काम करत आहोत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना टी. एस. सिंहदेव म्हणाले की, आमच्या जाहिरनामा समितीचे सदस्य ज्या ज्या राज्यात गेले आहेत तिथे ते विविध समाज घटकांशी आणि पक्ष पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. सोबतच सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका, जिल्हा आणि प्रदेश पातळीवर लोकांच्या सूचनांचा स्वीकार करावा. तसेच यासह जाहीरनामा समितीच्या सदस्यांसह सल्ला मसलत करावी. जाहिरनामा ज्यांच्यासाठी बनतोय त्या लोकांचा सहभाग यात असावा, यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
समिती सदस्यांना दिलेल्या राज्यांव्यतिरिक्त ज्या विषयात त्यांना आवड आहे, त्यातील ज्ञान आहे त्या माहितीचा वापर करूनही सूचना संकलित कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. तर, नागरिकांना आपल्या सुचना 'आवाज भारत की' awaazbharatki.in या संकेतस्थळावर आणि awaazbharatki@inc.in या इमेल आयडीवर पाठवता येतील, अशी माहिती सुप्रिया श्रीनेत यांनी यावेळी दिली.
काँग्रेसने गेल्या काही वर्षात अडाणी मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र तेलंगणा सरकारने नुकताच अडाणी समूहासोबत एक करार केला आहे. यावर विचारले असता काँग्रेसने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.