डीपफेकविरोधात 7 दिवसांत केंद्र सरकारकडून नवे नियम | पुढारी

डीपफेकविरोधात 7 दिवसांत केंद्र सरकारकडून नवे नियम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : डीपफेकविरोधात केंद्र सरकार येत्या 7 दिवसांत नवे नियम लागू करणार असून, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी त्याचे सूतोवाच केले. येत्या 7-8 दिवसांत नवे माहिती-तंत्रज्ञान नियम तयार तसेच लागू झालेले असतील, असे ते म्हणाले. नव्या नियमांतर्गत डीपफेकविरोधात वाढीव दंडाची तसेच कारावासाचा कालावधी वाढविण्याची तरतूद करण्यात येईल, असे सांगण्यात येते.

डीपफेक या विषयावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दोन बैठका घेतल्या. नव्या नियमांत चुकीची माहिती निर्मित आणि प्रसारित करण्याविरोधात तसेच डीपफेक तंत्र वापरून कन्टेंटनिर्मितीविरोधात अनेक तरतुदी करण्यात येत आहेत. त्यांचे पालन करणे अनिवार्य असेल; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी 23 नोव्हेंबर रोजी डीपफेक हा लोकशाहीला मोठा धोका असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते. डीपफेक निर्माता तसेच असा कन्टेंट होस्ट करणार्‍या प्लॅटफॉर्मवर त्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही वैष्णव म्हणाले होते.

प्रचलित नियम काय?

आयटी अ‍ॅक्ट 2000 नुसार एखाद्याबद्दल त्याच्या परवानगीशिवाय कन्टेंट तयार करणे हे खासगीपणाचे उल्लंघन मानले जाते. अश्लील फोटो वा व्हिडीओ बनविणे हेदेखील गुन्ह्याच्या कक्षेत येते. माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66 ई अंतर्गत या गुन्ह्यासाठी 3 वर्षे कारावास आणि 2 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. कलम 67 अंतर्गत सॉफ्टवेअर वा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करून अश्लील छायाचित्र तयार करणे, ते शेअर करणे या गुन्ह्यांसाठी 3 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. वारंवार असा गुन्हा केल्यास 5 वर्षे कारावास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

डीपफेक प्रकरणात भा.दं.वि.च्या 66 क, 66 ई आणि 67 नुसार कारवाई करता येते. भा.दं.वि. 153 अ आणि 295 अ नुसारही गुन्हा दाखल करता येतो. याउपर गुन्ह्यांना आळा बसत नसल्याने व दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत असल्याने नवे नियम अधिक कडक करण्यात येतील. दंडाची रक्कम वाढविली जाईल. शिक्षेचा कालावधी वाढविला जाईल, असे संकेत मिळाले आहेत.

पंतप्रधान मोदी, तेंडुलकर, रश्मिका यांचे डीपफेक व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचे डीपफेक व्हिडीओ अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एआय तंत्राचा वापर करून मूळ व्हिडीओतील पात्राचा चेहरा बदलून हे बनावट व्हिडीओ तयार करण्यात येऊन व्हायरल झाले होते.

Back to top button