बालकाण्ड भाग १ : श्रीराम प्रभू जन्म | पुढारी

बालकाण्ड भाग १ : श्रीराम प्रभू जन्म

संकलन : सुरेश पवार

पौष शुद्ध द्वादशी, सोमवार शके 1945, शोभन नाम संवत्सर, (22/1/2024) रोजी अयोध्यानगरीत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना होत आहे. मंगळवार दि. 16 जानेवारीपासून या महन्मंगल कार्याचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्त श्रीरामायणातील बालकांडातील सात कथा आजपासून सादर करीत आहोत.

रामायण-महाभारत हे महाग्रंथ भारतीय संस्कृतीचे मानदंड मानले जातात. रामायणाचे स्थान वेदांबरोबर असल्याचेही म्हटले आहे. रामायण हे केवळ काव्य नव्हे, तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चरित्र कथन करणारा इतिहास असल्याची श्रद्धा आहे. रामायणातील प्रत्येक सर्गात विविध रसांचा परमोत्कर्ष अनुभवाला येतो. म्हणूनच शेकडो वर्षे होऊन गेली, तरीही या राष्ट्रीय महाकाव्याची गोडी अविट राहिली आहे.

श्री रामायणाचा प्रारंभ बालकाण्डाने होतो. या बालकाण्डात पहिल्या काही सर्गात अयोध्यानगरी आणि श्रीराम जन्म यांचे वर्णन आहे. भरतवर्षात मानवाधिपती मनुने स्वत: निर्माण केलेली अयोध्या ही जगत्विख्यात नगरी होय. देवाधिपती इंद्राची जशी अमरावती, तशी ही अयोध्या! या अत्यंत वैभवशाली महानगरीत ईक्ष्वाकु कुळातील महातेजस्वी राजा दशरथ राज्य करीत असे. त्याने या नगरीचे आणि आपल्या राज्याचे वैभव कळसाला पोहोचवले होते.

अशा या दिग्विजयी राजाला पुत्रसंतती नव्हती. पुत्रप्राप्तीसाठी आपण अश्वमेध यज्ञ करावा, असा विचार त्याच्या मनी आला. त्याने आपल्या विद्वान मंत्रिमंडळास पाचारण केले. सुमंत्र या अमात्याला त्याने विद्वत्त जनास आमंत्रित करण्याची आज्ञा केली. राजपुरोहित वसिष्ठ यांच्यासह जाबाली, काश्यप, वामदेव, सुयज्ञ आदी द्विजश्रेष्ठ मुनिवर्य या आमंत्रणानुसार उपस्थित झाले. धर्मात्मा दशरथाने आपल्या मनीचे गूज त्यांना कथन केले. वसिष्ठांसह सर्व द्विजवरांनी राजाच्या मनोकामनेस आशीर्वाद दिला. शरयू नदीच्या उत्तर तीरी यज्ञभूमी स्थापन करावी आणि अश्वमेधासाठी अश्व सोडावा, असा सल्ला त्यांनी दिला. त्याप्रमाणे अश्व कोणी रोखू नये, रोखल्यास त्याचे पारिपत्य व्हावे, यासाठी बलाढ्य सेना बरोबर द्यावी, यज्ञभूमीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी राजाने सविस्तर आज्ञावली दिली.

अंगराजा रोमपाद हा दशरथाचा घनिष्ठ स्नेही. त्याचा जामात विभांडकपुत्र महातेजस्वी मुनिश्वर ऋष्यशृंग यांना नियोजित पुत्रकामेष्टी यज्ञात अध्वर्यू म्हणून निमंत्रित करण्याचे ठरले. राजा दशरथाने स्वत: अंगदेशी जाऊन ऋष्यशृंग यांना आमंत्रित केले व त्यांना घेऊन तो अयोध्येला आला. आपली मनोकथा त्याने ऋष्यशृंग यांच्या कानी घातली. ऋष्यशृंगांनी तत्काळ यज्ञाच्या तयारीची अनुज्ञा दिली. अश्वमेधासाठी वसंत ऋतूत अश्व संचारासाठी पाठवण्यात आला. पुढील वसंत ऋतूत यशस्वी होऊन अश्वाचे पुनरागमन झाले. राजा दशरथाने यज्ञदीक्षा घेतली. देशो-देशीच्या राजांना, विद्वान ब्राह्मणांना, क्षत्रियांसह शूद्रांना यज्ञयागाची निमंत्रणे पाठवण्यात आली. ऋष्यशृंग यांना ब्रह्मत्व देऊन यज्ञाचा शुभारंभ झाला. इंद्रासह सर्व देव-देवतांना हविर्भाग देण्यात आले. ज्योतिष्टोमसह सर्व महाऋतूंचे अनुष्ठान यथाविधी पार पडले. त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी ऋष्यशृंग मुनींनी पुत्रप्राप्ती साधनभूत इष्टी केली. या इष्टीवेळी अदृश्य रूपाने उपस्थित असलेल्या देव-देवता परिवाराने ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत झालेल्या राक्षसराज रावणाचा नाश व्हावा, अशी ब्रह्मदेवास प्रार्थना केली. त्याचवेळी प्रकट झालेल्या देवाधिपती महाविष्णूंची देव-देवतांनी विनवणी केली. मानवजन्म घेऊन आपण रावण वध करावा, असे देव-देवतांनी आळवल्यानंतर, महाविष्णूंनी दशरथ पुत्र म्हणून अवतार घेण्याचा निश्चय केला.

पुत्रकामेष्टी यागाच्या अग्नितून एक अपरंपार तेजस्वी महापुरुष प्रकट झाला. त्या महापुरुषाने राजा दशरथाला ‘पायस’ प्रसाद म्हणून अर्पण केले आणि त्याच्या तिन्ही राण्यांना द्यायला सांगितले. कौसल्येला आठ अंश, सुमित्रेला सहा अंश, कैकयीला दोन अंश याप्रमाणे या राण्यांनी पायसाचा प्रसाद ग्रहण केला.

या महायज्ञाची सांगता झाली आणि चैत्र नवमीस पुनर्वसु नक्षत्रावर चंद्र-गुरू लग्नी असता, पाच ग्रह अति बलाढ्य असे असताना श्रीरामाचा जन्म झाला. कौसल्येच्या पोटी भगवान विष्णूंचा अंश पुत्र रूपाने जन्मास आला. कैकयीस भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे देवांशांचे पुत्र जन्मास आले. अयोध्यानगरीसह राज्यभरात आनंदोत्सवाला उधाण आले. त्या सोहळ्याचे वर्णन काय करावे?

हे चारही पुत्र दिसामासानी वाढत गेले आणि बालवयातच त्यांचा पराक्रम, त्यांची अपार बुद्धिमत्ता, यांची प्रचिती येऊ लागली आणि राजपरिवारासह प्रजेच्या गळ्यातील ते ताईत बनले. त्या सर्वांमध्ये नक्षत्रात जसा चंद्र, ग्रहांमध्ये जसा रविराज शोभतो, तसा श्रीराम शोभत असे. श्रीराम जन्माने राजा दशरथ धन्य धन्य झाला.
॥ जय श्रीराम ॥

Back to top button