नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रामध्वज, जरीपटके, टोपी, टी-शर्ट, राम मंदिराचे छायाचित्र असलेले कुर्ते आदींना बाजारात जोरदार मागणी सध्या आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या मागणीतही कमालीची वाढ झालेली आहे. देशभरात 5 कोटींवर प्रतिकृतींची विक्री होईल, असा अंदाज आहे. विविध खेडी तसेच शहरांतून प्रतिकृती निर्मिती उद्योग सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अर्थव्यवस्थेच्या पंखांतून जटायूचे बळ भरले गेले असून देशात एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) वर्तविलेला आहे.
एकट्या दिल्लीतच 20 हजार कोटी रुपयांवर उलाढाल होईल, अशी शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, 22 जानेवारीपूर्वी व्यापार्यांसह अन्य सामाजिक संघटनांतर्फे देशात 30 हजारांवर कार्यक्रम आयोजिण्यात आलेले आहेत. याआधी महासंघाने प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने 50 हजार कोटी रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, दिवसागणिक दिल्लीसह देशभरातील वाढत गेलेला उत्साह पाहता तो दुपटीवर जाईल, असे संकेत मिळत आहेत. देशातील 30 विविध शहरांतून प्राप्त झालेल्या आकड्यांच्या आधारावर नवा निष्कर्ष काढण्यात आल्याचेही खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.
बँड, ऑर्केस्ट्रा, ढोल-ताशे पथके, सनईवादक आदींना मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळालेला आहे. आरास सजावटी करणार्यांचीही चांदी झालेली आहे. दिव्यांना मोठी मागणी आहे. लायटिंग, पुष्पसजावटीलाही तेजी आहे. भंडारे आदी सेवाही वाढल्या आहेत.
कॅटतर्फे काय काय?
कॅट संलग्न विविध संघटनांतर्फे सदस्यांना 11 पर्यंत दिवे देण्यात येतील. 500 वर एलईडी आणि साऊंड सिस्टीम लावल्या जातील. 300 वर ठिकाणी ढोल-ताशे वाजविले जातील. 100 वर श्रीराम मिरवणुका काढल्या जातील. दिल्लीत 5 हजारांवर फलक लावले जातील.