पुढारी ऑनलाईन डेस्क : मकर संक्रांती म्हणजेच दक्षिणेत साजरा केला जाणारा सण 'पोंगल'. या निमित्त तमिळनाडूमध्ये 'जल्लीकट्टू' या पारंपारिक साहसी खेळाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाही आजच्या दिवशी या खेळाचे तमिळनाडूच्या विविध ठिकाणी आयोजन केले आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील अवनियापूरम येथे आज जल्लीकट्टू खेळादरम्यान बैलाच्या हल्ल्यात मोठी दुर्घटना घडली. (Jallikattu Event)
जल्लीकट्टू खेळादरम्यानच्या दुर्घटनेत बैलाच्या हल्ल्यात एका पोलिस उपनिरीक्षकासह ३६ जण जखमी झाले. यामधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त येथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. (Jallikattu Event)
मदुराई जिल्ह्यातील अवनियापूरम येथे २०२४ मधील सर्वात मोठा जल्लीकट्टू या पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले. यासाठी १००० हजार बैल आणि ६०० खेळाडूंनी नोंदणी केली होती. यानंतर आज सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी संगीता यांच्या उपस्थितीत शपथविधी झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी ८ ते दुपारी ४ वेळेत ८ फेऱ्यांमध्ये खेळाचे आयोजित करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या खेळात पोलिस उपनिरिक्षकासह ३६ जण गंभीर जखमी झाले. तसेच याठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी २० वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. (Jallikattu Event)
तामिळनाडूमध्ये जानेवारी महिन्यात पोंगण सणादरम्यान जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळला जातो. या खेळात वळूंना वश करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे नाण्यांचा सग्रह. या पारंपरिक खेळात बैलाच्या शिंगांना एक पिशवी बांधली जाते. जेव्हा या स्पर्धेत बैलाच्या मागे तरुण धावतात. बैलाच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच विजेता ठरतो. या खेळात जेलीकट या जातीच्या वळूंचाच वापर केला जातो. त्यामुळे या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले.