पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर ५५ देशांतील प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले आहे. ( 55 Countries Heads Invited For Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony )
विश्व हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी 'एएनआय'शी बाेलताना सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद सदस्यांसह 55 देशांच्या सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत.
अमेरिका, इंग्लंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेलारूस, बोत्सवाना, कॅनडा, कोलंबिया, डेन्मार्क, डॉमिनिका, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), इजिप्त, इथिओपिया, फिजी, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, घाना, गयाना, हाँगकाँग, हंगेरी, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जमैका, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया, मलावी, मॉरिशस, मेक्सिको, म्यानमार, नेदरलँड, न्यूझीलंड, नायजेरिया, नॉर्वे, सिएरा लिओन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्पेन, श्रीलंका , सुरीनाम, स्वीडन, तैवान, टांझानिया, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वेस्ट इंडीज, युगांडा, व्हिएतनाम आणि झांबिया आदी देशांच्या प्रमुखांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. सर्व अति महत्त्वाच्या विदेशी प्रतिनिधी 20 जानेवारीला लखनौला येतील; त्यानंतर 21 जानेवारीला सायंकाळपर्यंत ते अयोध्येला पोहोचतील, असेही स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले.
राष्ट्रीय आणि इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले होते. ( 55 Countries Heads Invited For Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony )
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विहिंपने राजदमधील लालू प्रसाद यादव यांच्याकडे वेळ मागितला आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतील अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. हा कार्यक्रम भाजप आणि संघाचा असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवेदनात म्हटले आहे. येथे अर्धवट पूर्ण झालेल्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख्य अखिलेश यादव यांनी निमंत्रण नाकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना हे निमंत्रण विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, ज्यांनी मला आमंत्रण दिले त्यांना मी ओळखत नाही, मी त्यांना कधी भेटलो नाही. आपल्या ओळखीच्या लोकांकडूनच आपण आमंत्रण स्वीकारतो.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या राजकारणाच्या निषेधार्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे माकपने म्हटले आहे.तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
हेही वाचा :