मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

रायगड : राज्यात डब्बल इंजिन सरकार स्थापन होईपर्यंत विकासाचे सर्व प्रकल्प अडलेले होते. आज 90 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या विकासकामांचे लोकार्पण एवढ्या अल्प कालावधीत झाले, याचे मुख्य कारण काम करण्याची इच्छाशक्ती आणि मोदींची गॅरंटी हेच आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विकासकामांच्या लोकार्पणातून लोकसभेचे रणशिंग फुंकले.

मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब 'अटल सागरी सेतू'चे लोकार्पण करण्यात आले. त्यानिमित्त नवी मुंंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज उद्घाटन झालेला 'अटल सेतू' हा विकसित भारत कसा असेल याची झलक आहे, असे ते म्हणाले.

भारताच्या विकासासाठी समुद्राबरोबर टक्कर देऊन तो पार करून आम्ही पुढे जाऊ शकतो, हे या सेतूच्या उभारणीतून आपण सिद्ध करून दाखविले आहे. म्हणूनच आजचा दिवस भारत संकल्पसिद्धीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मंजूर होऊनही हा प्रकल्प रखडला होता. मात्र, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार अस्तित्वात आल्यावर विकास प्रकल्प मार्गी लागले. येत्या काळात डबल इंजिन सरकारच विकासाचे सरकार असेल, असा विश्वासही मोदी यांनी बोलून दाखवला.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पीयूष गोयल, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुनील तटकरे, खासदार आप्पा बारणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून 'मुंबई आणि मुंबई उपनगरातील उपस्थितांना माझा नमस्कार,' अशी केली.

अटल सागरी सेतू मुंबई-शिवडी ते न्हावा शेवा पनवेल हे अंतर आता वीस मिनिटांत कापता येणार आहे, त्यामुळे प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजचा भारत वेगाने बदलतो आहे. 'अटल सेतू' हे विकसित भारताचे प्रतीक आहे. तोच विकसित भारत कसा असेल याची झलक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची समृद्धी होणार आहे. दळणवळणाच्या सुविधांच्या विकासामुळे देशाचा कानाकोपरा एकमेकांशी जोडला जाणार आहे.

दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर 44 लाख कोटी

देशात 2014 पूर्वी पायाभूत सुविधांसाठी केवळ 12 लाख कोटी रुपयांचे बजेट दिले जात होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने 44 लाख कोटी रुपयांची तरतूद पायाभूत सुविधांसाठी केली आहे. त्यामुळे देशात मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचीही भाषणे झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news