क्यूआर कोड प्रकरणी काँग्रेस उगारणार कारवाईचा बडगा?

Congress
Congress

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या 'डोनेट फॉर देश' या देणगी मोहिमेत क्युआर कोड संबंधी झालेल्या गोंधळाची गंभीर दखल आज (दि.१२) पक्षनेतृत्वाने घेतली आहे. देणगी मोहिमेसाठी पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला क्युआर कोड काही ठिकाणी चुकीचा छापला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एक अंतर्गत समिती नेमण्याच्या आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सुचना पक्षनेतृत्वाने दिल्याचे समजते.

वादग्रस्त क्युआर कोड बुधवारी १० जानेवारीला समोर आला होता. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याबद्दल आणि पक्षाच्या देणगी मोहिमेविषयीचे एक पत्रक प्रसिद्ध केले होते. यावरील संकेतस्थळ आणि क्यूआर कोड चुकीचा प्रकाशित करण्यात आला होता. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकामध्ये क्यूआर कोडशी संलग्न केलेले संकेतस्थळ donateinc.co.in. हे आहे. याच संकेतस्थळाचा उल्लेख पत्रकावरही आहे, तर काँग्रेसला देणगी देण्याचे खरे संकेतस्थळ donateinc.in हे आहे. दरम्यान, चुकीच्या संकेतस्थळामुळे काँग्रेसला दिलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या बुधवारी चुकीच्या खात्यात पोहोचल्याचे समजते.

आज शुक्रवारी (दि.१२) कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परीषदेला राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा आणि सुप्रिया श्रीणेत उपस्थित होते. यावेळी सुप्रिया श्रीणेत यांनी 'क्यूआर कोड विषयावर वेगळी टीम काम करत होती. याबद्दल अधिक माहिती नाही. काही त्रुटी आढळल्या त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत.' अशी वरवरची प्रतिक्रिया देत या प्रकारावर अधिक बोलणे टाळले. एक प्रकारे त्रुटी झाल्याचे त्यांनी कबूल केले. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश हे माध्यम विभागाचे सरचिटणीस आहेत. तर प्रवक्ते पवन खेडा हे माध्यम विभागाचे अध्यक्ष आहेत आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे जबाबदारी कोणावर निश्चित करण्यात येईल, हे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाला १३८ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने 'डोनेट फॉर देश' हे देणगी अभियान कॉंग्रेसकडून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते दिल्लीतून १८ डिसेंबर २०२३ ला सुरु करण्यात आले. या अभियानाची सुरुवात करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः आपल्या फोन द्वारे १ लाख ३८ हजार रुपये काँग्रेस पक्षाला देणगी दिली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news