पुढारी ऑनलाईन डेस्क : डीआरडीओने (DRDO) न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची आज (दि.१२) सकाळी १०.३० वाजता यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनार्याजवळील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी श्रेणीतून अत्यंत कमी उंचीवरील उच्च-वेगवान मानवरहित हवाई लक्ष्याविरुद्ध ही चाचणी घेण्यात आली. उड्डाण चाचणी दरम्यान शस्त्रास्त्र प्रणालीद्वारे यशस्वीरित्या लक्ष्य नष्ट करण्यात आले. AKASH-NG Missile
न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राच्या (AKASH-NG Missile) उड्डाण चाचणीसाठी भारतात विकसित केलेल्या आरएफ सीकर, लाँचर, मल्टी-फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टमचा वापर करण्यात आला. संपूर्ण शस्त्र प्रणालीच्या कार्याचे प्रमाणीकरण केले आहे. ITR, चांदीपूर द्वारे तैनात केलेल्या एकाधिक रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमद्वारे कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे सिस्टम कार्यप्रदर्शन प्रमाणित केले गेले. उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओ (DRDO), बीडीएल (BDL), बीईएल (BEL) चे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय हवाई दलाचे (IAF) अधिकारी उपस्थित होते.
आकाश-एनजीच्या यशस्वी उड्डाण चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांचे कौतुक केले आहे. या प्रणालीच्या यशस्वी विकासामुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता आणखी वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा