मालवण, पुढारी वृत्तसेवा : नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाचा पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात आज अखेर दाखल झाला. मंगळवारी सायंकाळी नौदलाच्या ताफ्याने तारकर्ली समुद्रात सराव केला. या सरावाच्या वेळी आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा आदी क्लासच्या युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक असे संचालन केले. तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्त थरारक कसरती केल्या. यात मरीन कमांडोंसह अन्य नौदलाचे विभागही सामील झाले होते. नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. या कसरती पाहून नागरिक भारावून गेले तर लडाखु विमानांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता.
तारकर्ली च्या समुद्रात नौदलाच्या चित्तथरारक कसरती दाखविण्यात आल्या.सायंकाळीं पाच वाजता नौदलाचे मरीन कमांडो आकाशात पॅराशुट मधून खाली उतरत नौदलाच्या सरावाला सुरुवात झाली. निश्चित केलेल्या पॉइंट वर एका मागोमाग एक असे आकाशातू भारताच तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवत पॅराशुट द्वारे कमांडो खाली जमिनीवर उतरले. या नंतर आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्टनी आपल्या कसरती दाखविल्या. तारकर्लीच्या आकाशात लडाऊ विमानांनी कसरती चालू झाल्या नंतर त्यांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता.
समुद्रात तयार केलेली दुष्मनांची चौकी बाँबच्या साहाय्याने उध्वस्त करून मरीन कमांडोंनी आपलीं क्षमता दाखवून दिली. टार्गेट उध्वस्त केल्या. नंतर या कमांडोंना नौदलाच्या हॉलिकॅप्टर मधून एअर लिफ्ट करत सुरक्षित माघारी तळावर उतरविण्यात आले. याच बरोबर युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
खोल समुद्रात असलेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौके ने सुध्दा या सरावात सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. या युद्ध नोकेवरून काही लडाखू विमाने समुद्रातून आकाशात झेपावले होती. त्यांच्या कसरती पार पडल्या नंतर ही लडाखू विमाने विक्रमादित्यवर पुन्हा माघारी गेली.
तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात विनाशिका, फ्रि-गेट्स, कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, जलद हल्ल्याच्या युद्धनौका, सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर ध्रुव हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखविल्या.