‘मविआ’चे जागावाटपावर शिक्कामोर्तब? | पुढारी

‘मविआ’चे जागावाटपावर शिक्कामोर्तब?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. यामध्ये शिवसेना ठाकरे गट सर्वात मोठा भाऊ असणार, असे ठरल्याचे समजते. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही सोबत घेण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांची मागणी केली आहे. यापैकी दोन-तीन जागा कमी होऊ शकतात. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा काही जागा जास्त लढण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होते; मात्र अजित पवार गट वेगळा झाल्यामुळे जिथे ताकद नाही त्या जागा अदलाबदल केल्या जाणार आहेत. हीच भूमिका सर्व पक्षांनाही मान्य आहे. या समीकरणानुसार 2019 ला राष्ट्रवादीने लढलेल्या मावळ, भंडारा, गोंदिया, रायगड या जागा मित्रपक्षांकडे जाणार आहेत. इतर पक्षांच्याही काही जागांमध्ये अशा पद्धतीने बदल होऊ शकतो. मुंबईसह कोकणात शिवसेना अधिक जागा लढेल, तर विदर्भात काँग्रेस अधिक जागा लढणार आहे.

या बैठकीला काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित होते.

या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीसह सर्व पक्षाच्या नेत्यांची चांगली चर्चा झाली. आम्ही प्रत्येक जागानिहाय चर्चा केली. अनेक गोष्टी यातून स्पष्ट झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

जागावाटप महिनाअखेरपर्यंत पूर्ण होईल : शरद पवार

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चेतून मार्ग निघेल. सध्या जागा कोणाकडे, जागा कोणी लढवली, याचाही जागावाटपात विचार केला जाईल, असे सांगतानाच जानेवारीअखेरपर्यंत महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकत्रित आगामी निवडणुकांना सामोरे जावे. यासाठी दिल्लीतील बुधवारची प्राथमिक बैठक आहे. आणखीही बैठका होतील. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेतेदेखील आगामी बैठकांना उपस्थित राहतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांबाबत पवार म्हणाले की, जोपर्यंत सध्याचे केंद्र सरकार आहे तोवर असे छापे पडत राहणार. आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र वायकर यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही, असे पवार म्हणाले.

जागांपेक्षा भाजपला हटवणे हेच आमचे ध्येय : पटोले

नवी दिल्ली : देशात विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत चांगली चर्चा सुरू आहे. पुढच्या काही दिवसांत राज्यातही जागावाटप अंतिम होईल. एक-दोन जागांपेक्षा भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर करणे, हे आमचे ध्येय आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तसेच भाजप विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना धडकी भरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

गेले काही दिवस राज्यातील जागावाटपावरून विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विविध बैठकांसाठी दिल्लीत आले असताना बोलत होते. राज्यात जागावाटपामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये चांगली चर्चा सुरू आहेत. एखाद्या जागेवर जर अडचण येत असेल, तर पक्षश्रेष्ठी तो तिढा सोडवतील. मात्र, आम्ही एकत्र लढणार आहोत, जागावाटप हा अडचणीचा मुद्दाच नाही, असेही ते म्हणाले. तसेच वंचित बहुजन आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली. वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय होऊ शकेल, असेही ते म्हणाले. भाजप विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना धडकी भरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही त्याला घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.

Back to top button