

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम नवे कपडे घालून फोटो काढत असतात. कधी मंदिराचे बांधकाम सुरू आहे तिथे तर कधी समुद्रात, कधी मुंबईत, कधी केरळमध्ये असतात. सर्वत्र फोटो काढणारे पंतप्रधान मनिपुरला गेले नाहीत. देव दर्शन देत असल्यासारखे त्यांचे फोटो काढले जातात. पण हे महापुरुष मणिपूरला का जात नाही. मणिपूर हा भारताचा भाग नाही का, पंतप्रधानांना तिथे जाण्याची गरज वाटली नाही का ?, असा सवाल करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. Mallikarjun Kharge
संसदेत आम्हाला आमची मत मांडायची होती. मात्र तिथे आमचा आवाज दाबला गेला. जे खासदार काही बोलले नाहीत, त्यांनाही निलंबित केले गेले. १४० पेक्षा अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झाले मात्र पंतप्रधानांनी संसदेत यावर एक वक्तव्य केले नाही. असेही ते म्हणाले. काँग्रेस मुख्यालयात आज मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. Mallikarjun Kharge
१४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो आणि "न्याय का हक, मिलने तक" या घोषणेचे आणि या संदर्भातील व्हिडीओचे प्रकाशन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिपूरपासून सुरू होणारी यात्रा देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मूलभूत मुद्द्यांवर काढली जात आहे. या यात्रेला सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. असेही ते म्हणाले. तसेच पक्षाचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश भारत जोडो न्याय यात्रेबद्दल सविस्तर बैठका घेत आहेत. ज्या ज्या राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे त्या राज्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील त्यांची बैठक आणि चर्चा झाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा देशातील जनतेला न्याय मिळवून देईल, असा आशावाद काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजप ईडी, सीबीआय आणि आयकर विभागासारख्या संस्थांचा उघड गैरवापर करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या नातेवाईकांवर छापे टाकले जात आहेत. भाजप ज्यांना भ्रष्ट ठरवते ती मंडळी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळते, भाजपकडे सर्वात मोठे वाशिंग मशीन आहे, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान मोदी संविधानाला मानत नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मानतात, असेही ते म्हणाले.
राम मंदिर कार्यक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. याबाबत मी लवकरच निर्णय घेणार आहेत. तसेच ही वैयक्तिक श्रद्धेची बाब आहे. कोणीही कोणत्याही निमंत्रणाशिवाय कधीही तेथे जाऊ शकतो. इंडिया आघाडीतील जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात इंडिया आघाडी काम करत आहे. काँग्रेस पक्षांतर्गतही एक महत्त्वाची राष्ट्रीय आघाडी समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व राज्यांचा आणि जागांचा आढावा या माध्यमातून घेतला जात आहे. त्या त्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच आघाडीतील जागावाटप, या संदर्भात होणाऱ्या बैठका याबाबत लवकरात लवकर माहिती दिली जाईल.
हेही वाचा