Liberian ship hijack : अपहरण केलेल्या जहाजावरून सर्व भारतीय क्रू मेंबर्सची सुटका | पुढारी

Liberian ship hijack : अपहरण केलेल्या जहाजावरून सर्व भारतीय क्रू मेंबर्सची सुटका

एडन : वृत्तसंस्था : सोमालियाच्या सागरी किनाऱ्याजवळ सशस्त्र चाच्यांनी अपहरण केलेल्या लायबेरियाच्या व्यापारी जहाजावरून पंधरा भारतीय क्रू मेंबर्ससह अन्य सहा अशा एकूण २१ जणांची सुखरूप सुटका भारतीय नौसैनिकांनी केली. या लायबेरियन ध्वजांकित जहाजाचे नाव ‘लीला नॉरफोक’ आहे. नौदलाने ‘आयएनएस चेन्नई’ ही शस्त्रसज्ज नौका लायबेरियन जहाजाच्या दिशेने रवाना केली आणि नौसैनिकांनी कामगिरी फत्ते केली.

नौदलाच्या सूत्रांनी सांगितले की, आम्ही या घटनेची तातडीने दखल घेऊन लगेच कारवाईला सुरुवात केली. लायबेरियाच्या जहाजावर उपस्थित असलेल्या भारतीय क्रू मेंबर्सशी आधी संपर्क साधण्यात आला आणि नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. हे जहाज ब्राझीलमधील पोर्टो डो अकू येथून बहारिनमधील खलिफा बिन सलमान बंदराकडे जात होते. ११ जानेवारीला ते त्या ठिकाणी पोहोचणार होते. या जहाजाचा शेवटचा संपर्क ३० डिसेंबर रोजी झाला होता. या जहाजाने आपण संकटात असल्याचा संदेश यूके मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स पोर्टलला पाठवला होता. ४ जानेवारीच्या संध्याकाळी सुमारे ५-६ जण शस्त्रांसह जहाजावर उतरले आणि त्यांनी संपूर्ण जहाजाचा ताबा घेतला.

जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच नौदलाने सागरी गस्त घालणारे विमान जहाजाच्या दिशेने पाठवले. विमान सकाळीच जहाजाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यातून भारतीय क्रू मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर सर्व क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली. नौदलाच्या विमानांनी याकामी ‘आयएनएस चेन्नई’ला मदत केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून हुथी बंडखोरांनी सोमालियाच्या सागरी क्षेत्रात उच्छाद मांडला असून, व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे.

Back to top button