YS Sharmila joins Congress | मोठी बातमी! मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांचा YSRTP पक्ष काँग्रेसमध्ये विलीन | पुढारी

YS Sharmila joins Congress | मोठी बातमी! मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांचा YSRTP पक्ष काँग्रेसमध्ये विलीन

पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांनी आज त्यांचा वायएसआर तेलंगणा पक्ष (YSRTP) आज काँग्रेसमध्ये विलीन केला. वायएस शर्मिला यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत त्यावर शिक्कामोर्तब केले. (YS Sharmila joins Congress)

“काँग्रेस पक्ष अजूनही आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्याने नेहमीच भारताची खरी संस्कृती जपली आहे आणि आपल्या राष्ट्राचा पाया बांधला आहे…” अशी प्रतिक्रिया वायएस शर्मिला यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर व्यक्त केली.

वायएस शर्मिला यांनी काल इदुपुलापाया येथील भेटीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वायएस शर्मिला आज सकाळी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समिती मुख्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर काही दिवसांतच वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुखांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे.

वायएस शर्मिला या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक आणि अध्यक्षा देखील आहेत. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भारत राष्ट्र समितीचे (BRS) वर्चस्व संपुष्टात आणले. यानंतर आता ही घडामोड समोर आली आहे.

तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना फायदा होऊ शकणाऱ्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी त्यांनी तेलंगणात निवडणूक लढविण्यासही नकार दिला होता. “मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे. कारण तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयाची संधी आहे,” असे त्यांनी म्हटले होते.

“केसीआर यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि यामुळे केसीआर पुन्हा सत्तेत येऊ नयेत असे मला वाटते. मी वायएसआर यांची मुलगी या नात्याने काँग्रेसला पाठिंबा देत आहे.” असे वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी सांगितले होते. (YS Sharmila joins Congress)

लोकसभा निवडणुकीपूर्वीची मोठी घडामोडी

त्यांनी पुढे दावा केला की तेलंगणातील ३१ जागांवर काँग्रेसचा विजय मुख्यत्वे त्यांच्या पक्षाने निवडणूक न लढविल्याने झाला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी वायएस शर्मिला यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेशच्या निवडणुकीतही शर्मिला यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तेलंगणात काँग्रेसने प्रथमच ११९ पैकी ६४ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले. भारत राष्ट्र समितीला ३८ जागांवर समाधान मानावे लागले.

शर्मिला ह्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या लहान बहीण आहेत.

हे ही वाचा :

Back to top button