Parliament Security Breach : आरोपी नीलम आझादच्या सुटकेची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली | पुढारी

Parliament Security Breach : आरोपी नीलम आझादच्या सुटकेची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Parliament Security Breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणात आरोपी असलेल्या नीलम आझाद हिच्या सुटकेची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. १३ डिसेंबर २०२३ ला संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात नीलम आझादला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला दिलेली पोलीस कोठडी बेकायदेशीर आहे असे म्हणत तिच्या सुटकेची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

नीलम आझादच्या सुटकेसंबंधी याचिकेवर तत्काळ सुणावणी घेण्यात यावी, अशीही मागणी नीलमच्या वकीलांनी केली होती. ही मागणी देखील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नीलमच्या सुटकेची याचिका फेटाळून लावली. नीलमच्या सुटकेची याचिकेला दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी विरोध केला होता. हा मुद्दा ट्रायल कोर्टासमोर आधीच प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींनी तपासादरम्यान सातत्याने त्यांचे म्हणणे बदलले. तसेच त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते.

संसद सुरक्षा भंग प्रकरणात १३ डिसेंबर २०२३ ला चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यात लोकसभेत धुराचे नळकांडे फोडणारे डी. मनोरंजन, सागर शर्मा आणि संसदेबाहेर निदर्शने करणारे नीलम आझाद, अमोल शिंदे यांचा समावेश होता. त्यानंतर या कटाचा प्रमुख सुत्रधार असलेला ललित झा आणि महेश कुमावत यांनाही अटक करण्यात आली होती. हे सहाही आरोपी ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. (Parliament Security Breach)

Back to top button