केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक | पुढारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. २१ डिसेंबर २०२३ ला दहशतवाद्यांनी पूंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर गोळीबार केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद आणि तीन जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला महत्त्व आहे.

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत झालेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मीरमध्ये तैनात पोलीस, लष्कर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्यातील उत्तम समन्वयावर भर देण्यावर लक्ष वेधले. स्थानिक गुप्तचर यंत्रणा बळकट करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका आणि जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत शून्य-दहशतवाद योजना, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षेसंबंधी इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. २०२३ वर्षात नोव्हेंबरच्या सुरुवातीला लष्कराच्या वतीने कालाकोटमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर तिथे पाच सैनिक मारले गेले होते. तसेच एप्रिल आणि मे मध्ये पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात १० सैनिक मारले गेले. दरम्यान, अमित शहा यांनी गेल्या वर्षीही जानेवारी महिन्यात अशाच प्रकारची आढावा बैठक घेतली होती.

Back to top button