पीएफ खाते नोकरी बदलली की आपोआपच ट्रान्स्फर होणार | पुढारी

पीएफ खाते नोकरी बदलली की आपोआपच ट्रान्स्फर होणार

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : नोकरी बदलल्यानंतर आपला भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ट्रान्स्फर करण्यासाठी आता त्रास करून घ्यावा लागणार नाही. कारण, आता भविष्य निर्वाह निधी खात्याची सेंट्रलाईज सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच मंजुरी देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज्ची बैठक आज झाली. सेंट्रलाईज सिस्टीममुळे पीएफ खाते ट्रान्स्फर करण्याचा व्याप करावा लागणार नाही. ते काम आपोआप होणार आहे.

सेंट्रलाईज सिस्टीमच्या माध्यमातून संबंधित कर्मचार्‍याचे जुने पीएफ खाते नव्या खात्यात आपोआप विलीनीकृत होईल. सध्या तशी व्यवस्था नाही. त्यामुळे एखादी कंपनी सोडली किंवा दुसरी नोकरी स्वीकारली की, नव्या कंपनीकडून खाते उघडले जाते किंवा आधीच्या खात्यातील रक्कम खातेधारकाला ट्रान्स्फर करावी लागते. त्यासाठीची औपचारिकता पार पाडण्यात बराच वेळ जातो. आता ती गरज उरणार नाही. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

बदल काय असणार

सेंट्रलाईज सिस्टीमच्या माध्यमातून पीएफ खातेधारकाची वेगवेगळी खाती मर्ज होऊन एकच खाते तयार होईल. खातेधारकाने नोकरी बदलली की, नव्या कंपनीत सेंट्रलाईज पीएफ खात्याच्या माध्यमातून आधीच्या खात्यातील रक्कम खात्यात वळवली जाईल. बैठकीत अजूनही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यात व्याज वाढविण्यापासून पेन्शनधारकांची कमीत कमी पेन्शन 1 हजारावरून 3 हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रेड युनियनने पेन्शनची रक्कम 6 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे.

Back to top button