हॉटेल उद्योगाला श्रीराम पावले; अयोध्येच्या आतिथ्य क्षेत्राचे रूप पालटणार, प्रचंड आर्थिक उलाढाल होणार | पुढारी

हॉटेल उद्योगाला श्रीराम पावले; अयोध्येच्या आतिथ्य क्षेत्राचे रूप पालटणार, प्रचंड आर्थिक उलाढाल होणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्येतील भव्य मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लांचे आगमन होईल. त्यांच्यासोबतच देशातील आतिथ्य सेवेसाठी सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. 22 जानेवारीनंतर भविष्यात वाढणार्‍या भाविकांची संख्या ध्यानात घेऊन मॅरिअट इंटरनॅशनल, इंडियन हॉटेल्स, विंडहॅम हॉटेल्स या आणि देशभरातील बहुतेक सर्व बड्या हॉटेलांचे प्रकल्प सुरू होत आहेत. आगामी काळात अयोध्येच्या आतिथ्य क्षेत्राचे रूप पालटणार असून प्रचंड आर्थिक उलाढाल होणार आहे.

अयोध्येत मंदिर उभारणीच्या कामाला वेग यायला लागल्यावर अयोध्येच्या विकासाचे प्रकल्प सुरू झाले. त्यासाठी सरकारने कुकरेजा आर्किटेक्टस्, लिआ असोसिएटस् आणि एल अँड टी या संस्थांना अयोध्येची मास्टर ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम दोन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. त्यांनी आपला अंतिम आराखडा गेल्या वर्षी जानेवारीत सादर केला. त्यानुसार अयोध्येत सर्व श्रेणीतील हॉटेल व धर्मशाळा मिळून किमान 30 हजार रूम असाव्यात असे म्हटले होते.

अयोध्येतील कामांनी जसा वेग घेतला तसे हॉटेल व्यवसाय सुरू करणार्‍यांचे त्याकडे लक्ष गेले. पाठोपाठ उत्तर प्रदेश गृहनिर्माण विभागाने हॉटेलांच्या भूखंडांसाठी ई-निविदा काढल्या. त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की सारे आतिथ्य क्षेत्र थक्क झाले.

अयोध्येत भविष्यात भाविकांची गर्दी ध्यानात घेऊन या क्षेत्रातील सर्व बड्या हॉटेल कंपन्यांनी अयोध्येकडे मोहरा वळवला आहे. आजघडीला अयोध्येत फक्त पाच ब्रँडेड हॉटेल्स आली आहेत. त्यात 520 खोल्या आहेत. पण भविष्यात मॅरिअट इंटरनॅशनल, इंडियन हॉटेल्स, विंडहॅम हॉटेल्स, सरोवर हॉटेल्स या जगभर साखळी हॉटेल्स असलेल्या कंपन्या अयोध्येत बडी बडी हॉटेल्स सुरू करीत आहेत. या शिवाय थ्री स्टारपासून पंचतारांकितपर्यंत सर्व श्रेणींमधील हॉटेल्स अयोध्येत उभारली जाणार आहेत.

* मॅरिअट इंटरनॅशल, इंडियन हॉटेल्स, विंडहॅम हॉटेल्स, सरोवर हॉटेल्स मैदानात
* प्रारंभी 350 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
* 80 खोल्यांंचे सरोवर हॉटेल्सचे पार्क इन रॅडिसन्स पूर्णत्वाकडे
* इंडियन हॉटेल्सची जिंजर आणि विवांता श्रेणीची हॉटेल्स
* विंडहॅम हॉटेल्स सुरू करणार रामाडा एन्कोअर श्रेणीचे हॉटेल्स

Back to top button