प्रेग्नंट जॉब एजन्सीच्या नावाने फसवणूक | पुढारी

प्रेग्नंट जॉब एजन्सीच्या नावाने फसवणूक

पाटणा, वृत्तसंस्था : ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी असे अजब नाव देत चक्क निपुत्रिक महिलांना गरोदर करण्यात मदत करण्याची नोकरी देणार्‍या एका एजन्सीचा पर्दाफाश करण्यात बिहार पोलिसांना यश आले आहे. एजन्सीच्या आठजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या नोकरीच्या माध्यमातून तरुणांना 13 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात येत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना कुमार व त्याचे साथीदार हे फसवणुकीचे रॅकेट चालवत होते. त्यासाठी त्यांनी व्हॉटस्अपचा वापर केला. नोकरीची संधी असे मेसेज पाठवत ते बेरोजगारांना आकर्षित करीत. समाजातील निपुत्रिक महिलांना गरोदर करण्यात मदत करा व 13 लाख रु. मिळवा, अशी जाहिरात करताना त्यांनी एजन्सीचे नाव चक्क ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी असे ठेवले. बेरोजगार तरुणांना फक्त 799 रुपयांत नाव नोंदवा, जर त्यांच्याकडून संबंधित महिला गरोदर राहिली तर 13 लाख रु. मिळतील, असे आमिष देण्यात आले होते. संबंधित महिला गरोदर राहिली नाही तरी पाच लाख रु. त्यांच्या खात्यात जमा केले जातील, असेही सांगण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून कुणी नाव नोंदवले तर त्याला सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली 5 हजार ते 25 हजार रुपये उकळले जायचे. संबंधित क्लाएंट महिलेच्या सौंदर्यानुसार हे डिपॉझिट बदलले जायचे. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या टोळीकडे पैसे भरले.

सोशल मीडियावर लक्ष ठेवणार्‍या पोलिसांच्या आयटी सेलच्या निदर्शनास या जाहिराती आल्यानंतर त्यांनी नवाडा जिल्ह्यात कारवाई करीत आठजणांना अटक केली. मात्र या टोळीचा म्होरक्या मुन्ना कुमार पसार होण्यात यशस्वी झाला. या टोळीच्या ताब्यातून 9 मोबाईल, दोन प्रिंटर्स , शेकडो व्यक्तींचे फोन नंबर व पत्ते असलेल्या याद्या व इतर कागदपत्रे जप्त केली.

Back to top button