31 December : एक दिवस-एक रात्र, दर फक्त सात लाख! ‘या’ हॉटेलचा दर देशात सर्वाधिक | पुढारी

31 December : एक दिवस-एक रात्र, दर फक्त सात लाख! 'या' हॉटेलचा दर देशात सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला लाखो पर्यटक घराबाहेर पडतात. आप्त, मित्र यांच्यासमवेत काही निवांत क्षण घालवण्यासाठी पर्यटनस्थळांना भेट देतात. यंदा ३१ डिसेंबरला पंचतारांकित अनुभव घेण्यासाठी एका दिवसासाठी सात लाख रुपये मोजले आहेत. राजस्थानमधील राजेशाही थाटाच्या हॉटेलचा दर देशात सर्वाधिक आहे. तर, पंचतारांकित अनुभवासाठी दिवसाला ३० हजार रुपयांपासून दर मोजण्यात आले आहेत.

राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण किनारपट्टीतील राज्यांमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाला पर्यटकांची गर्दी होत असते. सरत्यावर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे यंदा पंचतारांकित हॉटेलमध्ये गर्दी झाल्याचे हॉटेल संचालकांकडून सांगण्यात आले. राजस्थानमधील उदयपूर येथील द लीला पॅलेसमध्ये ३१ डिसेंबरला रूम शिल्लक नाही. त्यांनी या दिवसासाठी १ लाख ६ हजार रुपये आकारले आहेत.

राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडाने एका दिवसासाठी १ लाख २० हजार रुपये आकारले आहेत. येथील महाराजा सूटला एका रात्रीसाठी सात लाख रुपये आकारण्यात आले आहेत. विदेशी पर्यटकांसाठी देखील या हॉटेलला मागणी असते. मात्र, आधी बुकिंग केले नसल्यास त्यांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची माहिती हॉटेलचे संचालक रजत गेरा यांनी दिली.

गोव्यातील पणजी येथील डबल ट्री- हिल्टन हॉटेलचे दर गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहेत. येथील रूमसाठी १८ ते २६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. जेडब्लू मॅरिएट मसूरी वॉलनट ग्रोव्ह रिसॉर्ट आणि स्पासाठी दिवसाला ३२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. उदयपूरमधील झाना लेक रिसॉर्टला दोन दिवसांसाठी ५५ हजार रुपये आकारण्यात येत आहेत. फेअरमाँट जयपूरला ६५ हजारांहून अधिक रक्कम आकारली जात आहे. नियोजन करून येणाऱ्या पर्यटकांपेक्षा ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

होरवर्थ एचटीएलचे संचालक विजय ठाकर म्हणाले, या वर्षी पंचतारांकित हॉटेलचे दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. दर जास्त असूनही पर्यटकांची ती मोजण्याची तयारी आहे. शिवाय गेल्या वर्षपिक्षा यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. मागणी आणि पुरवठा हे तत्त्वही दरांना लागू होते, म्हणून यंदा दर जास्त आहेत.

असे आहेत पंचतारांकित हॉटेलचे दर

• सिक्स सेन्सेस फोर्ट, बरवाडा (राजस्थान) : १.२ लाख
• झाना लेक रिसॉर्ट (उदयपुर): २७,५००
• फेअरमाँट (जयपूर) : ६५,०००
• लीला पॅलेस (जयपूर) : ३१,६८३
• हिल्टन (गोवा) : १८,०००-२६,०००
• जेडब्लू मॅरिएट (मसुरी) : ३२,०००

Back to top button