Ayodhya Ram Mandir Inauguration : देशाने २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी! | पुढारी

Ayodhya Ram Mandir Inauguration : देशाने २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी!

अयोध्या, वृत्तसंस्था : अयोध्येचा कायापालट झालेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनामुळे हे शक्य झाले आहे. आज अयोध्या प्रगतीच्या उत्साहात न्हाऊन निघालेली आहे. काही दिवसांतच रामलल्लाचा जेव्हा अभिषेक होईल, तेव्हा ही नगरी परंपरेच्या उत्सवाने उजळून निघालेली असेल. अयोध्येतील राम मंदिर हे देशाच्या परंपरेचे प्रतीक आहे. ते संपूर्ण देशाला उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. 22 जानेवारीला या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे. हा दिवस संपूर्ण देशाने दिवाळीसारखाच धूमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

अयोध्याधाम रेल्वे स्थानक तसेच विमानतळाच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येतील हे ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आलेले आहेत. भारतातील सर्व 140 कोटी बंधू-भगिनींनी 22 जानेवारीला रामलल्ला जेव्हा अयोध्येत विराजमान होतील, तेव्हा रामज्योती प्रज्वलित करावी, अशी माझी हात जोडून प्रार्थना आहे. दिवाळीप्रमाणेच हा दिवस सर्वांनी साजरा करावा. 22 जानेवारीला अयोध्येत येणे सर्वांना शक्य होणार नाही. येणे हितावहही नाही. संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर अगदी दुसर्‍या दिवसापासून सहकुटुंब अयोध्येला या. आपण मंदिरासाठी तब्बल 550 वर्षे वाट पाहिलेली आहे. अजून काही दिवस वाट पाहिली तर फार काही बिघडणार नाही.

रामलल्लाला बरेच दिवस तंबूत राहावे लागले. रामलल्लाला कायमस्वरूपी घर मिळालेले आहे. त्याचवेळी या पायगुणांमुळेच देशातील चार कोटी गरीब जनतेलाही घर मिळालेले आहे, असे पंतप्रधान निवास योजनेचा संदर्भ देऊन पंतप्रधानांनी सांगितले.

केवळ भारत नव्हे तर संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहे. मी भारतातील मातीच्या प्रत्येक कणाची आणि इथल्या प्रत्येक माणसाची पूजा बांधलेली आहे. मीही या क्षणासाठी तितकाच उत्सुक आहे. उत्साही आहे. उत्साहच केवळ अयोध्येच्या रस्त्यांवर मला दिसत होता, असे त्यांनी नमूद केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारा ध्वज फडकावला होता. त्यामुळे या तारखेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. अयोध्येतून आज याच तारखेला विकसित भारताच्या उभारणीला गती देणारी ऊर्जा मिळत आहे. अयोध्येत आज 15 हजार 700 कोटी रुपयांचे 46 विकास प्रकल्प सुरू आहेत.

अयोध्या केवळ अवधला नव्हे, उत्तर प्रदेशलाच नव्हे तर देशाच्या विकासाला दिशा देणार आहे. वंदे भारत आणि नमो भारतनंतर देशाला आणखी एक आधुनिक रेल्वेगाडी मिळाली आहे. नव्या रेल्वेगाडीला अमृत भारत हे नावही एका अर्थाने समर्पक असेच आहे. गाड्यांची ही त्रिमूर्ती भारतीय रेल्वेला नवसंजीवनी देणारी ठरेल, असा आत्मविश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

भारताने एकीकडे केदारनाथ धामचे पुनरुज्जीवन करताना दुसरीकडे 315 वर नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारलेली आहेत. उज्जैनमध्ये महाकाल महालोकाची उभारणी करताना प्रत्येक घरापर्यंत पाणी आले पाहिजे म्हणून देशभरात दोन लाखांहून अधिक जलकुंभही उभारले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर येथे पर्यटन वाढेल. ते लक्षात घेऊन आम्ही हजारो कोटी रुपयांची विकासकामे करत आहोत. अयोध्येला स्मार्ट बनवत आहोत. कुठल्याही देशाने विकासाची नवी उंची गाठायची तर राष्ट्रीय वारसा जपला पाहिजे. अयोध्येतील राम मंदिराच्या रूपात आपला वारसा आपल्याला विकासाची प्रेरणा देईल. आजचा भारत परंपरा आणि वर्तमानाची सांगड घालून उज्ज्वल भविष्याकडे निघालेला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह, खासदार लल्लू सिंह उपस्थित होते. एकूण 15 हजार कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधानांनी यावेळी केले.

मुंबई-जालना वंदे भारत रेल्वे सुरू

अयोध्या आणि इतर स्थानकांवरून धावणार्‍या दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत एक्स्प्रेसना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसलाही व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवला.

असे आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ

* गेट आणि भिंतींवर राम मंदिराची झलक
* नवीन टर्मिनल इमारतीत सात शिखरे
* मुख्य इमारतीत रामायणातील सात अध्यायांचे प्रतीक म्हणून सात स्तंभ
* विमानतळाबाहेर धनुष्यबाणाचे मोठे भित्तीचित्र
* पहिल्या टप्प्यावर खर्च एक हजार 470 कोटी रुपये
* नवीन टर्मिनल इमारत एकूण 6 हजार 500 चौरस मीटर क्षेत्रफळावर
* वार्षिक क्षमता 10 लाख प्रवासी
* एकूण विमानतळ 821 एकरवर
* पहिल्या टप्प्यात दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई अशी उड्डाणे सुरू होतील.
* 6 जानेवारी रोजी पहिले विमान दिल्लीहून स. 11.55 वाजता उड्डाण करेल.
* 15 जानेवारीपासून मुंबई-अयोध्या विमानसेवा सुरू होईल.

Back to top button