Madhya Pradesh Accident | मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघातानंतर बसला आग, १३ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Madhya Pradesh Accident | मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघातानंतर बसला आग, १३ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री एका प्रवासी बसला आग लागल्याने १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. गुना-आरोन मार्गावर एका खासगी बसची डंपरशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात अन्य १७ जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Madhya Pradesh Accident)

प्राथमिक माहितीनुसार, डंपरला धडकल्यानंतर बस पलटी झाली आणि तिला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

जिल्हा रुग्णालयात १७ जणांवर उपचार सुरू आहे. तर बस आणि ट्रकच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी गुनाचे जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी दिली. या भीषण आगीत मृतदेह जळून खाक झाले असून त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

सर्व मृतदेह घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बसमधून सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चौघे बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Madhya Pradesh Accident)

दुःखदायक घटना

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही घटना दुःखदायक असल्याचे म्हटले आहे. “या घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो आणि त्यांना मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले,” असे शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा ;

 

Back to top button