केंद्र सरकार 25 रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करणार | पुढारी

केंद्र सरकार 25 रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तांदळाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता केंद्र सरकार भारत ब्रँडअंतर्गत तांदूळ 25 रुपये किलो दराने विकणार आहे. सध्या देशात तांदळाची सरासरी किंमत 43 रुपये किलो आहे. यामुळे महागाईपासून आम जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. भारत ब्रँड तांदळाची विक्री नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि केंद्रीय संस्थांद्वारे केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारने या तांदळाची योग्यरीत्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या डाळींची आणि पीठाचीही विक्री सुरू करण्यात आली आहे.

व्यापार्‍यांना केंद्र सरकारचा इशारा

केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापार्‍यांना इशारा दिला आहे. सरकार तांदूळ 25 रुपये किलोने उपलब्ध करून देत आहे. मात्र, तरीही तांदळाचे भाव वाढत चालले आहेत. त्यामुळे तांदळाचा साठा करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे तांदळाचा साठा करून कृत्रिम भाववाढ करणार्‍यांविरोधात सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहे. केंद्र सरकारने 27.50 रुपये किलो या दराने 6 डिसेंबर रोजी ‘भारत आटा’ लाँच केला होता. भारत नावाच्या ब्रँडचा आटा सध्या 10 आणि 30 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तांदळाप्रमाणेच आटाही नाफेड आणि सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Back to top button