OTT Platforms : ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलते विरोधात कडक कायदा हवा’ | पुढारी

OTT Platforms : ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलते विरोधात कडक कायदा हवा’

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : OTT Platforms : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील माहिती प्रसारणाला देशविरोधी कृत्य मानून त्यासाठी कडक कायदे बनवण्यात यावेत. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० ते २० वर्षांची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी दिल्लीत सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. तसेच अश्लील सामग्रीवर कारवाईसाठी विद्यमान माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये संशोधनाची गरज असल्याचे मतही संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

अश्लील सामग्री प्रसारणाबद्दल जी-२० परिषदेत गांभीर्याने विचार करण्यात आला आणि जी-२० च्या टुलकीटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, अशी माहिती सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनचे प्रमुख, माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी दिली. जेम्स ऑफ बॉलीवूडच्या सहाय्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे संशोधन यावर एक श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेल्या सामग्रीतील अश्लीलतेचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दृकश्राव्य सामग्रीसह दृष्य, भाषा आणि कपडे यांच्यासाठी मर्यादा ठरवण्याचेही माहुरकर यांनी सुचवले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून लैंगिक अश्लीलता पसरवणे थांबवले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनच्या पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रसंगी संस्थेचे प्रमुख आणि माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर, आनंदधामचे संस्थापक रितेश्वर महाराज, हिंदू धर्म आचार्य सभेचे संयोजक परमात्मानंद सरस्वती, सर्वोच्च न्यायालयातील वकील मोनिका अरोरा, जेम्स ऑफ बॉलीवूडचे संस्थापक राजीव नेवार, स्वाती गोयल शर्मा उपस्थित होते.

उदय माहुरकर म्हणाले की, एका अभ्यासानुसार बलात्कार करणाऱ्या काही आरोपींनी ओटीटी आणि अन्य प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ किंवा चित्रपट पाहिले. आणि त्यापासून प्रभावित होऊन बलात्कारासारखे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. अशी अनेक उदाहरणे असुन हे गंभीर असल्याचेही ते म्हणाले. ओटीपी प्लॅटफॉर्मवर सेन्सरशिप नसलेले जवळपास ५०० एप्लीकेशन्स आहेत. ज्या माध्यमातून चित्रपट आणि मालिका लोकांना बघता येतात. या गोष्टी बहुसंख्य प्रमाणात हिंदू समाज केंद्रित बनवल्या जातात. मनोरंजनाच्या नावावर अश्लीलता पसरवणारी सामग्री थांबवली पाहिजे. अश्लील सामग्री ही नव्या भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे, दुबईच्या धर्तीवर भारतातही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातुन अश्लील माहिती प्रसारणावर बंदी आणावी आणि लैंगिक अश्लीलता दाखवणारे सर्व चित्रपट, मालिकांवर बंदी घालावी, असेही माहुरकर म्हणाले.

Back to top button