Indian Politics Flashback : सेमीफायनलमध्येही भाजप बाजीगर; मोट बांधण्यात इंडिया आघाडी बेजार

Indian Politics Flashback : सेमीफायनलमध्येही भाजप बाजीगर; मोट बांधण्यात इंडिया आघाडी बेजार

2023 हे वर्ष अनेक राजकीय घडामोडींची साक्ष ठरले. संसदेची नवी व दिमाखदार इमारत उभी राहिली. याच इमारतीत राजकारणातील महिलांचा सहभाग निश्चित करणारा कायदाही संमत झाला. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. कुठे सत्तापालट झाले, कुठे सत्ता कायम राहिली, कुणी तुरुंगात गेले, कुणी पक्ष सोडला, कुणी पक्ष घेऊन अन्य पक्षात गेले, असे बरेच काही घडले. सरत्या वर्षाकडे सिंहावलोकन केले तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ठळकपणे दिसते. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिसतात. महाराष्ट्रातील अजित पवार यांचे शरद पवार यांना सोडून (अजित पवारांच्या मते, शरद पवारांच्या संमतीने) राष्ट्रवादी पक्षासह भाजपला येऊन मिळणे दिसते. (Indian Politics Flashback)

चालू वर्षाच्या पायावर आगामी वर्षाची इमारत

तुमचा आज कसा आहे, त्याच्या पायावरच बहुतांशी तुमचा उद्या उभा राहातो. आगामी वर्ष हे चालू वर्षाच्या मजल्यावरच पुढचा मजला बांधत असते… आगामी वर्षात लोकसभेच्या निवडणुका होतील. चालू वर्षातील विधानसभा निवडणुका यातूनच आगामी लोकसभेची सेमिफायनल मानल्या गेल्या आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल, अजित पवार यांचे राष्ट्रवादीसह भाजपच्या गोटात येणे या क्रमश: देश व राज्याच्या द़ृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचे स्केच तयार करणार्‍या घडामोडी आहेत. पुढच्या वर्षी मतदान आणि निकालाचे रंग त्यात भरले गेलेले असतील! (Indian Politics Flashback)

Indian Politics Flashback  : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय

बेंगळुरू येथे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या.
बेंगळुरू येथे आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या.

दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण व भाजपच्या ताब्यात असलेले कर्नाटक हे राज्य विधानसभा निवडणुकीअंती काँग्रेसने हिरावून घेतले. 224 पैकी 135 जागांवर शानदार विजय काँग्रेसने मिळविला. भाजपचा दक्षिण भारतातील एकमेव बुरूज अशाप्रकारे ढासळला. अवघ्या 66 जागांवर भाजपला समाधान मिळाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बी. एस. येडियुरप्पांऐवजी बसवराज बोम्मईंना मुख्यमंत्री बनविण्याचा भाजपचा प्लॅन फसला. सिद्धरामय्या हे या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले.

Indian Politics Flashback : राहुल गांधींची खासदारकी!

न्यायालयाच्या एका निकालाने मोदी आडनाव अब्रुनुकसानीच्या प्रकरणात वायनाडचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली. त्यांना 2 वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. पुढे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयला स्थगिती दिली. खासदार म्हणून राहुल गांधी पुन्हा कार्यरत झाले.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

मनीष सिसोदिया
मनीष सिसोदिया

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली. अटकेनंतर 1 मार्च 2023 रोजी सिसोदियांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे आणखी एक विशेष या वर्षात घडले. दिल्ली मद्य परवाना वाटप घोटाळ्यात सिसोदियांसह आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनाही अटक झाली.

त्रिपुरा, नागालँड, मेघालय निवडणुकांत भाजपच पुढे

2 मार्च रोजी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपला वरचष्मा सिद्ध केला. इशान्येकडील या राज्यांपैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये आधीच असलेले आपले सरकार कायम राखण्यात भाजपला यश आले. मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. याउपर कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पक्षाचे सरकार स्थापन झाले.

Indian Politics Flashback  : नारी शक्ती वंदन अधिनियम

महिला आरक्षण विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम या नव्या नावासह 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली. आता हा कायदा बनलेला आहे. लोकसभा तसेच देशातील सर्व विधानसभांतून महिलांसाठी अनुक्रमे खासदारकी व आमदारकीच्या 33 टक्के जागा आरक्षित झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र या कायद्याची अंमलबजावणी शक्य होणार नाही.

ईशान्येसह बहुतांश राज्यांत फुलले कमळ

पहिल्या टप्प्यात ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वरचष्मा सिद्ध केला होता. कर्नाटकने निराशा केली होती. 3 डिसेंबर रोजी झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने जादू केली. 4 नोव्हेंबर रोजी हाती आलेल्या निकालात मिझोराममध्ये झेडपीएम पक्षाने विजय मिळविला.

नव्या संसद भवनाचे उद्घाटन

28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. एकूण 20 विरोधी पक्षांनी या समारंभावर बहिष्कार घातला.

भाजपशी मुकाबल्यासाठी इंडिया

भाजपच्या विरोधात मुकाबला करावयाचा तर संयुक्त ताकद हवी. काँग्रेस वा अन्य प्रादेशिक पक्षांची एकएकट्याच् तेवढी कुवत नाही, ही बाब लक्षात आली आणि 18 जुलै रोजी विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी नावाची एक मोट बांधली. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पराभव करणे, हे एक समान उद्दिष्ट ठरले. बाकी विषयांवर नंतर चर्चा होत राहील, यावरही मतैक्य झाले. प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा मात्र इंडिया आघाडीतील सामंजस्याचा अभाव ठळकपणे लोकांसमोर आला. कधी आप आणि काँग्रेसमध्ये, तर कधी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये खटके उडताना दिसले. इंडिया आघाडीत सुरुवातीला पुढाकार घेताना दिसत असलेल्या शरद पवारांचा उत्साह नंतर नंतर मावळत गेलेला दिसला. राजकीय विश्लेषकही इंडिया आघाडीबद्दल बुचकळ्यातच पडलेले दिसतात.

राष्ट्रवादीत फूट; अजित पवार भाजप गोटात

80 च्या दशकात काँग्रेसपासून वेगळे होऊन शरद पवार यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. भाजपचा पाठिंबाही त्यावेळी पवार यांनी घेतला होता. पवार हे सत्तेसाठी स्वत: आमच्याकडे आले, असे तत्कालीन भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी स्पषट केले होते. सत्तेचे एवढेही कौतुक नको, असे नमूद करायलाही वाजपेयी विसरले नव्हते. हे इथे आठवण्याचे कारण म्हणजे शरद पवार यांचे पुतणे तसेच राष्ट्रवादीतील क्रमांक 2 चे नेते अजित पवार हे सरत्या वर्षात जुनमध्ये जवळपास संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष सोबत घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले. शरद पवार यांच्यासोबत मोजके लोक शिल्लक राहिले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शिंदे-फडणवीस-पवार सरकार बनले. महाराष्ट्राच्या विधानसभेची समीकरणेही बदलली. जून महिन्यात जे आमदार विरोधी पक्षात होते, ते ट्रेझरी बेंचवर आले. अजित पवार स्वत: विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, जुलैमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांनी दगाफटका केल्याचा आरोप केला. 1980 मध्ये स्वत: काय केले, ते अर्थातच आता मागे पडलेले होते! साहेबांशी (शरद पवार) सल्लामसलत करूनच आपण पुढे निघाल्याचे अजित पवार सांगत राहिले. शिवसेनेतून शिंदे आणि राष्ट्रवादीतून अजित पवार आपल्या मागे पक्षातील मोठी बोगी घेऊन बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी अक्षरश: लघुविकास आघाडी बनलेली आहे. 288 आमदारांच्या महाराष्ट्र विधानसभेत गतनिवडणुकीत भाजप-सेना युतीने 161 जागा जिंकल्या होत्या. 145 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. 105 जागांसह आजही भाजपच विधानसभेत अव्वल स्थानी आहे. शिवसेनेने स्वत:च्या 56 व काँग्रेस (44)-राष्ट्रवादी (54) आघाडीच्या आमदारांसह महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले. पुढे मागील वर्षी 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आपल्या 51 आमदारांसह, तर चालू वर्षात अजित पवार 30 वर आमदारांसह भाजपच्या गोटात दाखल झाले. विधानसभेत विरोधी पक्ष नसल्यात जमा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजप, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना मैदानात असेल तर समोर आहे त्या स्थितीतील काँग्रेस व नावाला उरलेली महाविकास आघाडी असेल… घोडामैदान फार लांब नाही; पण ही महाराष्ट्रातील सेमिफायनलही या अर्थाने भाजप आघाडीने जिंकलेली आहे, असेच आजचे एकुणातील चित्र सांगते.

Indian Politics Flashback  : राहुल गांधींची भारत जोडो,  थोडी खुशी ज्यादा गम

भारत जोडो यात्रा
भारत जोडो यात्रा

…तर 2023 पहिली पहाट झाली आणि भारतीय राजकारणाचा सूर तसेच नूर काहीसा का होईना आता बदलतो की काय, असे चित्र रंगविणारे दिवस पुढे उजाडू लागलेले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचीच पुटे प्रत्येक दिवसावर चढलेली होती. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर राहुल गांधींना उदंड प्रतिसाद होता. राहुल कितीही म्हणत असले, की मला भारत समजून घ्यायचा आहे, तरीही या यात्रेला राजकारणाशी जोडून पाहिलेच गेले. कारण 2023 मध्येच कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणाच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या होत्या. कर्नाटक निवडणुकीपासून सुरुवातही झाली. इथे काँग्रेसला बहुमत मिळाले. महत्त्वाचे म्हणजे राहुल यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गावरील 51 जागांपैकी बहुतांश जागा काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेसमध्ये कमालीचा उत्साह होता; पण वर्ष सरत असताना मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक पट्ट्यातील तिन्ही मोठ्या राज्यांत भाजपने संपूर्ण बहुमतासह विजय मिळविला. राजस्थान, छत्तीसगड ही राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून गेली. तेलंगणात मात्र काँग्रेसला विजय मिळाला. दहा वर्षांची केसीआर यांची सद्दी संपली. या राज्यातही एका अर्थाने भाजपला फायदाच झाला. इथे भाजपचे अस्तित्व अधिक गडद झाले. मध्य प्रदेशातील 21 मतदारसंघांतून राहुल यांची भारत जोडो गेली होती, यातील 17 जागा भाजपने जिंकल्या.

सप्टेंबर 2022 मध्ये कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या राहुल यांच्या यात्रेचा जानेवारी 2023 मध्ये काश्मीरात समारोप झाला. राहुल इथे बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबत अगदी निर्धास्त बर्फ-बर्फही खेळले. इथेच भाजप समर्थकांनी त्यांच्यावर कडी केली… या प्रसंगाचा फोटो घेतला आणि त्यावर लिहिले, एकेकाळी दहशतवाद्यांचा ताबा असलेल्या राज्यात तुम्ही इतके कूल आहात… आम्ही 370 कलम रद्द केले म्हणूनच हे शक्य झालं आहे बरं, अशी ओळ त्यावर लिहिली…

खासदार बृजभूषण सिंह आणि मल्लांची दंगल दंगल

वर्षाच्या सुरुवातीला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. त्याचे कवित्व वर्ष सरले तरी सुरूच आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी आंदोलन केले. सिंह यांनी आरोपांचा इन्कार केला. न्यायालयाने हस्तक्षेप केला तेव्हा तक्रार नोंदवली गेली. सिंह महासंघातून बाजूला झाले. निवडणुकीत मात्र त्यांचाच समर्थक निवडून आला. बजरंग पुनिया यांनी मग त्यांना मिळालेले सारे पुरस्कार परत केले. सरकारने ही कुस्ती महासंघच बरखास्त केला.

महुआ मोईत्रांची हकालपट्टी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना पैसे घेऊन (लाच) सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याच्या प्रकरणात 8 डिसेंबर रोजी अनैतिक आचरणावरून बडतर्फ करण्यात आले. महुआ या 2019 मध्ये करीमनगर मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news