Call Recording : सावधान… कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना? कसे ओळखाल? | पुढारी

Call Recording : सावधान... कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना? कसे ओळखाल?

मोबाईल कॉल रेकॉर्डिंग (Call recording) हा विषय केवळ तांत्रिक नाही. कॉल रेकॉर्डिंगमुळे वाद, भांडणे होतात. नातेसंबंधांवर परिणाम होतो. व्यावसायिक हानी होते. माणसाचे खासगी जीवन सार्वजनिक होऊन समाजात ताण-तणाव निर्माण होतात. प्रकरणे हातघाईवरही येतात. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा विषय गाजलेला आहे. त्यामुळे सत्ताकारणासाठी राजकीय करिअरवर आघात करण्याचे प्रयत्न होतात.

सहज आहे शक्य

मोबाईलवर समोरील व्यक्ती तुमचा संवाद अगदी सहज रेकॉर्ड करू शकते. यासाठी बर्‍याचवेळा कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. अशा अ‍ॅपवर बंदी आहे. त्यामुळे अन्य डिव्हाइसमधून कॉल रेकॉर्डिंग केले जाते. (Call recording)

कसे ओळखाल कॉल रेकॉर्डिंग?

कॉल रेकार्डिंग ओळखणे सोपे. मोबाईलवर संभाषण सुरू असताना समोरील व्यक्ती जेव्हा कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात करते, तेव्हा बीप असा आवाज येतो. बीप अथवा तत्सम आवाज आल्यास तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय, हे लक्षात घ्या. तुमचा आवाज ईको होत असल्यासही कॉल रेकॉर्ड होतो, हे ध्यानात ठेवा. कॉल रिसिव्ह केल्यानंतर बराच वेळ बीप असे ऐकू येत असेल, तरीही कॉल रेकॉर्ड होत असल्याचा संशय घ्या.

फोन टॅपिंग…

दोघातील संवाद तिसरी व्यक्ती विनापरवानगी ऐकत असेल, तर त्याला फोन टॅपिंग म्हणतात. फोन टॅपिंगसाठी मात्र तज्ज्ञ आवश्यक असतात. यासाठी कायदेशीर कारण लागते. तसेच समोरून बोलणार्‍या व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंगसाठी पूर्वपरवानगी आवश्यक ठरते, मात्र बहुतेकवेळा ती घेतली जात नाही. आता तर मोबाईलवर कॉन्फरन्स्वर कॉल घेणे सर्रास सुरू आहे. ते कितपत कायदेशीर, याबाबत मत-मतांतरे उमटतात.

आर्थिक नुकसान, प्रतिमेची हानी

व्यक्ती संभाषणात वैयक्तिक तसेच व्यावसायिक चर्चा करते. महत्त्वाचे मुद्दे शेअर करते. हे रेकॉर्ड होऊन सामायिक (व्हायरल) होते. त्यामुळे मोठे व्यावसायिक नुकसान होते. प्रतिमा मलिन होते. मानसिक छळाला सामोरे जावे लागते.

कायदा काय सांगतो?

  • छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार एखादी व्यक्ती पत्नी अथवा मैत्रिणीचे कॉल रेकॉर्ड करत असेल, तर ती शिक्षेस पात्र ठरते. तसेच या निकालात कॉल रेकॉर्डिंग हे कायद्याचे उल्लंघन मानले आहे.
  • तसेच आयटी कायद्याच्या कलम 72 नुसार कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच असे कॉल रेकॉर्ड करणे हे घटनेच्या कलम 21 चे उल्लंघन मानले आहे. आय टी कायदा 2000 च्या कलम 72 अंतर्गत कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणावर कोणतेही वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड करू शकत नाही. तसेच ते सार्वजनिक करू शकत नाही. असे करणे गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन आहे.
  • आता अ‍ॅण्ड्रॉईड स्मार्ट फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्ड फीचर आधीच बंद केले आहे.
  • घटनेच्या कलम 21 अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या माहितीशिवाय अथवा पूर्वपरवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे चुकीचे मानले आहे.

(संकलन : विवेक दाभोळे)

Back to top button