उपराष्ट्रपतींचे भेटीचे निमंत्रण मल्लिकार्जुन खर्गेनी धुडकावले | पुढारी

उपराष्ट्रपतींचे भेटीचे निमंत्रण मल्लिकार्जुन खर्गेनी धुडकावले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : संसदेतील गदारोळ आणि १४६ खासदारांच्या निलंबनावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून भेटायला बोलावले होते. आता खर्गे यांनीही पत्राद्वारे उत्तर दिले असून दिल्लीबाहेर असल्याने भेटणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभा सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण सध्या दिल्लीबाहेर असल्यामुळे भेट घेता येणार नाही. सोबतच सभापतींच्या कार्यशैलीवरही खोचक टिप्पणी खर्गे यांनी या पत्रात केली आहे. खर्गे यांनी म्हटले आहे की, सभापती हे सभागृहाचे पालक असतात. त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, संसदीय विशेषाधिकारांचे रक्षण करताना संसदेत चर्चा आणि चर्चेद्वारे सरकारला जबाबदार धरण्यात अग्रेसर असले पाहिजे. चर्चेविना गोंधळातच विधेयके मंजूर केल्याबद्दल आणि सरकारकडे जबाबदारीची मागणी न केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांचा इतिहास कठोरपणे न्याय करेल तेव्हा वाईट वाटेल.

खासदार निलंबनानंतर खर्गे यांनी धनकड यांना पत्र लिहून नाराजीचा सूर लावताना मोठ्या संख्येने खासदारांच्या निलंबनामुळे आपण व्यथित, हताश आणि निराश असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर म्हणून सभापती धनकड यांनी पत्र लिहून खर्गे यांना २५ डिसेंबरला भेटण्याचे निमंत्रण दिले होते.

संबंधित बातम्या

हे तर सरकारच्या मुजोरीचे समर्थन : खर्गे

धनकड यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, विरोधकांनी जाणूनबुजून आणि ठरवून पद्धतशीरपणे सभागृहात गोंधळ घातला होता. त्या विधानाचा संदर्भ घेत खर्गे म्हणतात की, आपण असे विधान करून सरकारच्या संसदेप्रती असलेल्या स्वकेंद्रित आणि मुजोर भूमिकेचे समर्थन करत आहात. तुम्ही आमच्या चिंता व प्रश्न राज्यसभेचे सभापती म्हणून निष्पक्षपणे तपासायला हवे होते. उलट हक्कभंग प्रस्तावांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हत्यार म्हणून केला गेला, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

Back to top button