COVID JN.1 variant cases | कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका! देशभरात नवे ६३ रूग्ण; गोव्यात सर्वाधिक | पुढारी

COVID JN.1 variant cases | कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका! देशभरात नवे ६३ रूग्ण; गोव्यात सर्वाधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क: JN.1. या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, या नवीन व्हेरिएंटचे देशभरात नवे ६३ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही आकडेवारी रविवार २४ डिसेंबपर्यंतची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. ( JN.1 COVID variant cases)

या वृत्तानुसार, नवीन व्हेरिएंट JN.1 ची गोव्यात-३४, महाराष्ट्रात-९, कर्नाटक-८, केरळमध्ये ६, तामिळनाडूत ४ आणि तेलंगणात २ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ( JN.1 COVID variant cases)

२०१९ चा हिवाळा होता आणि संपूर्ण जग जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते. पण, आपल्या सर्वांना माहित आहे की, प्रत्येकाचे आयुष्य एका जीवघेण्या विषाणूने बदलून टाकले. हा विषाणू प्रथम चीनमध्ये आढळून आला आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगावर आक्रमण केले. तो म्हणजे कोरोना. चार वर्षांनंतर कोविड-१९ साथीचा रोग नियंत्रणात आहे असे वाटत असले तरी हा विषाणू त्याच्या अनेक उत्क्रांती स्वरूपांमध्ये अजूनही आपल्यामध्ये आहे. कारण या डिसेंबरमध्ये कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तो म्हणजे JN.1. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ( JN.1 COVID variant cases)

जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 चे “व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट” म्हणून वर्गीकरण केले आहे. पण सार्वजनिक आरोग्यासाठी त्याचा कमी प्रमाणात धोका असल्याचे नमूद केले आहे.

JN.1 व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोना विषाणूच्या नवीन म्युटेशनला JN.1 असे नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित केले आहे. भारत, चीन, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये तो आधीच आढळून आला आहे. BA.2.86 वंशाचा भाग, जो SARS-CoV-2 च्या Omicron अथवा B.1.1.529 प्रकाराचा वंशज आहे. JN.1 व्हेरिएंट हा स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्युटेशनसह आला आहे.

पीएसआरआय इन्स्टिट्यूट ऑफ पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जी. सी. खिलनानी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ”नवीन व्हेरिएंटमुळे ताप, घसा खवखवणे, खोकला आणि डोकेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. तर वृद्ध, लठ्ठ आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग (COPD), मधुमेह, कर्करोग आणि इतर आजाराने त्रस्त लोकांना तो हानिकारक ठरू शकतो.”

हेही वाचा:

Back to top button