वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरुद्ध उमेदवारीवर इंडिया आघाडीचा खल | पुढारी

वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरुद्ध उमेदवारीवर इंडिया आघाडीचा खल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल ठरलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या मोठ्या यशानंतर आता विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधानांच्या वाराणसी या मतदार संघातून तगडे आव्हान देण्याचे घाटत आहे.

मोदींविरोधात लोकसभा निवडणुकीत हाय-प्रोफाईल उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन नावांचा प्रस्ताव असून, यात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा ही 2 नावे सध्या आघाडीवर आहेत.

गत लोकसभा निवडणुकांत पंतप्रधानांना या मतदार संघात 60 टक्क्यांवर मते मिळालेली आहेत. तीन लाखांवर मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत. येत्या निवडणुकीत त्यांना सहजासहजी विजय मिळू नये, अशी रणनीती विरोधी पक्ष आखणार आहे. इंडिया आघाडीने पंतप्रधानांना आव्हान देऊ शकेल, अशा सुपरस्टार्सची एक यादी तयार केली आहे. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये जागावाटपावर चर्चेसाठी विरोधी नेते जमलेले होते आणि यानंतरच वाराणसी मतदार संघातील संभाव्य उमेदवाराची चर्चा सुरू झाली. 2004 चा अपवाद वगळता वाराणसीच्या जनतेने 1991 नंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान केले आहे. पंतप्रधान मोदींना 2014 मध्ये, तसेच दुसर्‍यांदा 2019 मध्ये 60 टक्क्यांहून अधिक मते दिली.

1952 पासून दशकभरापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसची पकड होती. नंतर मात्र ती सैल होत गेली. 2014 मध्ये मोदी या मतदार संघातून उभे राहिल्यानंतर तर विरोधी पक्षांसाठी इथे जमीन कमालीची अरुंद झाली.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी 2014 मध्ये मोदींविरुद्ध वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढविली होती. केजरीवाल यांना तब्बल 3.37 लाखांनी पराभव पत्करावा लागला. पुढे 2019 मध्ये मोदींविरोधात काँग्रेसकडून प्रियांका गांधींना मैदानात उतरविण्याचे घाटत होते, पण ऐनवेळी काँग्रेसने येथील नेते अजय राय यांना उमेदवारी दिली. राय यांचा दारूण पराभव झाला. पाच लाखांवर मतांनी ते मागे पडले होते. तिसर्‍या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले होते. आता 2024 मध्ये मोदींच्या मुकाबल्यात मजबूत उमेदवार देण्याची इंडिया आघाडीची योजना आहे. अशोका हॉटेलच्या बैठकीत काही नावांची चर्चाही झाल्याचे, तसेच 2024 च्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी वेगळे प्रयोग करूयात, यावर सारे विरोधक सहमत झाल्याचेही सांगण्यात येते.

वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरुद्ध दुरंगी लढत व्हावी, असा एकास एक उमेदवार देण्याचेही ठरलेले आहे. वाराणसी म्हणजेच काशी, हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे सभा घेण्याचे महिनाभरापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केलेलेच होते. अर्थात त्यांना परवानगी मिळाली नाही.

गत दोन्ही निवडणुकांचे उच्चांक मोडतील पंतप्रधान?

पंतप्रधान मोदींनी वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या राबविला आहे. वाराणसीच्या अर्थकारणात त्यामुळे सकारात्मक बदल झालेले आहेत.

अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वाला आल्यानंतर हिंदूंची धर्मनगरी असलेल्या वाराणसीत पंतप्रधानांना यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा अधिक मते मिळतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Back to top button