४ वर्षांहून लहान मुलांना ‘ते’ कफ सिरप देऊ नका | पुढारी

४ वर्षांहून लहान मुलांना ‘ते’ कफ सिरप देऊ नका

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-खोकला झाल्यास क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्रिनचे मिश्रण असलेले सिरप देऊ नये, असे निर्देश ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय/औषध नियंत्रक) जारी केले आहेत. असे मिश्रण ज्या औषधांमध्ये आहे, त्यावर तसे लेबल असायलाच हवे, अशी कडक सूचनाही ‘डीसीजीआय’ने केली आहे.

सिरपमध्ये क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन किती मिसळावे, त्याचे प्रमाण ठरलेले आहे, ते पाळले जाते का, ते पाहणे गरजेचे आहे, असे औषध नियंत्रकांनी नमूद केले आहे. भारतात बनवलेले कफ सिरप वापरल्याने काही देशांत मुलांना मृत्यू ओढावल्याचा आरोप झाला होता. तथापि संबंधित कंपन्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते, हे येथे उल्लेखनीय!

याउपर औषध नियंत्रकांनी नुकतेच सर्व राज्यांना पत्र लिहिले असून, यात क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन या 2 घटकांच्या मिश्रणातून तयार झालेल्या सिरपच्या बाटलीवर तसे ठळकपणे नमूद करायला हवे, असे निर्देशही दिले आहेत. गाम्बिया, उझ्बेकिस्तान या देशांतून वरील मिश्रणाचे कफ सिरप घेतल्याने बालरुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचा आरोप या देशांनी केला होता.

Back to top button