पंतप्रधानपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव | पुढारी

पंतप्रधानपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आणले आहे. इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. दरम्यान, 22 डिसेंबरला इंडिया आघाडीतर्फे देशभरात निदर्शने करण्याचा निर्णय मंगळवारी झाला. तसेच लोकसभा निडणुकीसाठी आघाडीतील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चा राज्यपातळीवर होईल. काही अडचण आल्यास अंतिम निर्णय केंद्रीय नेते करतील, असेही इंडिया आघाडीने आज ठरविले.

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या या प्रस्तावित उमेदवारीला खर्गे यांनी नकार दिला आहे. सर्वाधिक खासदार निवडून आणण्याला इंडिया आघाडीचे प्राधान्य असेल. पंतप्रधानपदाचा उमेदवार नंतर ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर व्यक्त केली. खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’तर्फे मांडण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी इंडिया आघाडीची चौथी बैठक आज दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदप्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यासह 28 पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

या सर्व नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत माध्यमांना सामोरे जाऊन इंडिया आघाडीच्या एकजुटीचा संदेशही दिला विरोधकांसाठी धक्कादायक ठरलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या बैठकीमध्ये आघाडीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित करणे, इंडिया आघाडीचा समन्वयक ठरविणे, भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी विरोधकांतर्फे आक्रमकपणे मांडण्याचे मुद्दे आणि आगामी प्रचार, यावर विचारमंथन झाले. तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील 141 खासदारांच्या निलंबनावर बैठकीत चर्चा झाली. विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. तसेच 22 डिसेंबरला खासदारांच्या निलंबनाविरुद्ध देशभरात निदर्शने करण्याचेही ठरविण्यात आले.

समन्वयक होण्यास खर्गेंचा नकार

आजच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करावे, अशी सूचना केली. त्याआधी खर्गे यांना इंडिया आघाडीचे समन्वयक बनवावे, असाही प्रस्ताव या मुख्यमंत्रीद्वयींनी मांडला. मात्र, खर्गे यांनी यावर नकार देताना निवडणुकीनंतरच यावर निर्णय होईल, असे बैठकीत सांगितलेे.

आधी बहुमत आणायला हवे : खर्गे

दरम्यान, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आज झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सोबतच, पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरही सूचक टिपणी केली. खर्गे म्हणाले की, सर्वांनी आधी जिंकून यायला हवे. जिंकायचे कसे त्यावर विचार करायला हवा. कोण पंतप्रधान बनेल ही नंतरची गोष्ट आहे. खासदारांची पुरेशी संख्या नसेल, तर पंतप्रधानपदाची चर्चा करून उपयोग काय? आधी सर्वांनी बहुमत आणण्याचे प्रयत्न करावेत, असे खर्गे म्हणाले.

मोदी-शहांचा भ्रम मोडणार

देशभरात आगामी काळात इंडिया आघाडीच्या आठ ते दहा बैठका होतील, असे आज ठरल्याचे सांगताना खर्गे म्हणाले की, जागावाटपावर सर्व पक्ष एकत्रितपणे काम करतील. पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब यासह इतर ठिकाणी जागावाटपावर तोडगा निघेल. प्रथम राज्यातील नेते एकमेकांशी स्थानिक पातळीवर चर्चा करतील. त्यात काही अडचण आल्यास केंद्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे नेते त्यावर तोडगा काढतील. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही खर्गे यांनी टीकास्त्र सोडले. संसदेच्या सुरक्षाभंगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा संसदेत न बोलता, बाहेर बोलत आहेत. त्यांना लोकशाही संपुष्टात आणायची आहे. देशात केवळ आपणच सत्ता गाजविण्यासाठी पात्र आहोत, असे पंतप्रधान, गृहमंत्र्यांना वाटत आहे. आम्ही त्यांचा हा भ्रम मोडीत काढण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्व मिळून एकत्रितपणे 22 डिसेंबरला देशभरात निदर्शने करणार, अशी घोषणा खर्गे यांनी यावेळी केली.

Back to top button