Shivraj Singh Chouhan : पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार: शिवराजसिंह चौहान
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'मला जे काम दिले जाईल ते मी करेल,' अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशात भाजपच्या यशात मोलाचा वाटा असलेले आणि नंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद झालेले अनुभवी नेते शिवराजसिंह चौहान यांनी दिली. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने पक्ष माझ्यासाठी जी भूमिका ठरवेल, ती मला मान्य असेल. तसेच मी केंद्रात आणि राज्यातही असणार आहे, असेही ते म्हणाले. Shivraj Singh Chouhan
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्वाची मानली जाते. दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीनंतर झालेली ही पहिलीच भेट होती. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जबरदस्त विजय मिळवला. मात्र पक्षनेतृत्वाने शिवराजसिंह चौहान यांना हुलकावणी देत मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. मोहन यादव यांच्या गळ्यात टाकली. Shivraj Singh Chouhan
दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालानंतरही शिवराजसिंह चौहान यांनी ग्वाल्हेरमध्ये जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. आता त्यांनी दिल्लीत येऊन भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, मी माझ्यासाठी काहीही मागण्यासाठी दिल्लीला जाणार नाही. स्वतःसाठी काहीतरी मागण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन. या विधानाची मोठी चर्चाही झाली होती.
शिवराजसिंह चौहान यांनी दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना पक्षात मानाचे स्थान आणि जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत माजी मुख्यमंत्री शिवराज यांच्यासोबत सल्लामसलत करण्यात असल्याचे समजते.
हेही वाचा

